पुणे : उच्च न्यायालय आणि गृहखात्याच्या आदेशानुसार गेल्या काही दिवसांत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांवर जोरदार कारवाई सुरू आहे. परंतु याबाबत नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सभेत सदस्यांनी प्रचंड तीव्र भावना व्यक्त केल्या. याबाबत बुधवार (दि. १९) रोजी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत धार्मिक स्थळांबाबत सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या संदर्भात गृहविभागाचा अभिप्राय येइपर्यंत कारवाई स्थगित करण्याचा निणर्य घेण्यात आला, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
शहरातील धर्मिक स्थळांवर होत असलेल्या कारवाईला सर्वपक्षीय विरोध झाल्यामुळे बुधवारी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिक्रमण प्रमुख माधव जगताप, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले आदी यावेळी उपस्थित होते. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी ‘ब’ वर्गातील मंदिराचा समावेश ‘क’ वर्ग आणि ‘अ’ वर्गामध्ये करता येईल का? याविषयी चाचपणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ब वर्गातील मंदिरे अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील एक महिना शहरातील धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येणार नाही, असे टिळक यांनी सांगितले.महापालिका प्रशासनाने गृहविभागाल प्रतिज्ञापत्र दिले असून यामध्ये धार्मिक स्थळांची आकडेवारी देण्यात आली आहे. गृहविभागाला सुधारीत प्रतिज्ञापत्राव्दारे ब वर्गातील धर्मिकस्थळांचा समावेश अ वर्ग आणि क वर्गामध्ये करण्यासंदर्भात महापालिका कार्यवाही करत असल्याचे कळवणे. त्याचबरोबर याबाबतचा अभिप्राय गृहविभागाकडून मागवण्यात येणार असल्याचे टिळक यांनी सांगितले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येत आहे. गृहविभागाकडून वारंवार कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. उच्च न्यायालय या सर्व कारवाईवर देखरेख ठेवत असून अहवाल सादर करावा लागत आहे. अनधिकृत धार्मिक स्थळांचा निर्णय हा देशभरासाठी लागू आहे. शहरी व ग्रामीण भागातसुद्धा अशा प्रकारची कारवाई सुरू आहे. शहरामध्ये सर्व प्रार्थनास्थळांची माहिती गोळा करण्यात आली आहे. अ वर्गामध्ये १३५ धार्मिकस्थळे असून ती नियमित करण्यात येवू शकतात. क वर्गामध्ये ६१ धार्मिकस्थळे असून त्यांचे स्थलांतर करून अथवा अनेक नागरिकांशी चर्चा करून नियमित केली जावू शकतात. ब वर्गातील धार्मिक स्थळांवर सध्या महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.यापुढे सरसकट कारवाईशहरातील वाहतूक सुरळीत होणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणाºया सर्व घटकांवर सरसकट एकदाच कारवाई करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.- मुक्ता टिळक, महापौर