लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘नको, ही गड्डी नको, दुसरी द्या’ असे म्हणत भाजीच्या ढिगात हाताळलेली गड्डी टाकून देणे.
‘ही नोट चालणार नाही’ म्हणत पहिली नोट देत दुसरी घेणे.
दुकानाच्या काऊंटरवर किंवा विक्रेत्याच्या गाडीवर त्याला खेटून गप्पा मारत ठिय्या ठोकणे.!
शहरातील कोणत्याही भाजी मंडईत, व्यापारी पेठेतल्या कोणत्याही दुकानात दिवसभरात १०० वेळा दिसणारी ही दृश्य!
ही आहेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होण्याची कारणे. यात दोघांनीही मास्क वापरलेला नसतोच आणि असलाच तर बोलण्यासाठी म्हणून तो नाकाखालीच नाही तर थेट गळ्यालाच टायसारखा अडकवलेला असतो. सॅनिटायझरचा विषय तर जवळपास संपलाच आहे. एकच भाजी गड्डी कितीतरी जणांकडून हाताळली जाते. एकच नोट दिवसभरात अनेकांच्या हातातून खिशात जाते-येते. गप्पा मारताना टाळ्या दिल्या-घेतल्या जातात, खोकले, शिंकले कितीवेळा जाते याची गणतीच नाही. कणकण वाटते आहे, पण कोरोनाबिरोना नाही हे अतीशय आत्मविश्वासाने सांगितले जाते. कसलीही वैद्यकीय तपासणी वगैरे न करताच!
यातून कोरोनाचा भयंकर विषाणू वेगाने पसरतो आहे असे साथरोग तज्ज्ञांचे मत आहे. मास्क वापरला, सॅनिटायझर वापरले तर ही भीती काही अंशाने तरी कमी होते. किमान काळजी घेतल्याने वेगाला आवर तरी अगदी नक्की बसेल असे त्यांना वाटते. रस्त्यावरच्या किरकोळ खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांवर विकणारा व विकत घेणारा दोघेही कष्टकरी आहेत, पण तेच अनेकांच्या संपर्कात कामाच्या निमित्ताने येत असतात. त्यांना जागरूक करणे, शिस्त लावणे, सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर याच्या वापराची माहिती देणे हे प्रशासनाचे काम आहे, ते सोडून सध्या प्रशासन केवळ आकडेवारी जाहीर करत लॉकडाऊनची शक्यता वाढवण्याचे काम करत आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील काही नामवंतांनी सांगितले.
कोरोनाचा वेग थांबवणे माहितीचा जास्तीतजास्त प्रसार करण्यातूनच शक्य होईल असे तज्ज्ञांना वाटते. भाजी मंडया, व्यापारी पेठा, सायंकाळी रस्तोरस्ती लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, मास्क, सॅनिटायझरचा वापर होत नसेल तर त्यांना जबर दंड करावा, विनाकारण गर्दी करणाऱ्यांनाही चाप बसवावा, यातून कोरोना प्रादुर्भावाचा वेग निश्चितपणे कमी होईल व लॉकडाऊनची गरज पडणार नाही असे बहुसंख्य वैद्यकीय व्यावसायिकांचे मत आहे.