पुणे: पाऊस पडायला सुरुवात हाेताच, लगेचच शहरातील रस्त्यांची चाळण झाली. सगळे रस्ते पावसापुढे माना टाकत असल्याचे दिसत असतानाच, तब्बल ४० वर्षांनंतरही जंगली महाराज रस्ता अजून ताठ मानेने वाहनांची धुरा वाहतोच आहे. हे ऐकल्यानंतर खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना आश्चर्यच वाटत आहे. हा रस्ता खड्डेमुक्त राहिले. कारण मध्यभातून ताे कधीच खाेदला गेला नाही.
जंगली महाराज मंदिरापासून ते थेट डेक्कनपर्यंतचा रस्ता आजही गुळगुळीत आहे. त्यावर एकही खड्डा पडलेला नाही. त्याच्या दोन्ही बाजू कितीदा तरी खोदल्या गेल्या. मॉडेल रस्ता म्हणून त्याचे पदपथ प्रशस्त केले गेले. मध्यभागावर काही ठिकाणी गतिरोधक तयार झाले, झेब्रा क्रॉसिंगच पट्टे ओढले गेले इतकाच काय तो फरक! बाकी सगळा रस्ता मध्यभागापासून दोन्ही बाजूंनी संपूर्णपणे विनाखड्डाच आहे.
सन १९७५ मध्ये शिवाजीनगर भागातील हनुमंत अमराळे स्थायी समितीचे सभापती असताना या रस्त्याचे काम झाले. महापालिकेचे निवृत्त नगरसचिव सुनील पारखी यांनी ही माहिती दिली. ठेकेदार पुण्याबाहेरचे होते. ते कोण होते, कामावर खर्च किती झाला, याचा तपशील नाही. मात्र, त्यानंतर या रस्त्यावर लहानसहान कामे वगळता आजपर्यंत कोणतेही मोठे काम झालेले नाही. तशी नोंद महापालिकेच्या दप्तरात नाही. त्यामुळेच सगळीकडे खड्डे पडत असताना, या रस्त्यावर मात्र खड्डे का पडत नाहीत, याची चर्चा आजही होत असते.
रस्ते बांधणी क्षेत्रातील काही जाणकारांनी सांगितले की, जंगली महाराज रस्ता मजबूत राहण्याची कारणे रस्त्याच्या बांधणीत आहे. रस्ता तयार करताना तो प्रथम खोदावा लागतो. तो किती खोलवर खोदायचा, त्यावर कोणत्या आकाराच्या खडीचे किती थर द्यायचे, कोणत्या क्रमाने द्यायचे, याचे तंत्र आहे. त्या पद्धतीने काम केले, तर रस्त्याची मजबुती कायम राहते.
...म्हणून रस्ता मजबूत
रस्ता करताना त्यावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या, त्यांचे प्रकार, वापर किती वेळ व कसा होतो, यावर खोदाई, खडीकरण, त्यावर दबाव, मग डांबर, मग पुन्हा चर (अगदी बारीक खडी) मग खडीची जवळपास पांढरी पावडर याची गणिते केली जातात व निविदेत तसे स्पष्ट नमूद केले जाते. जंगली महाराज रस्त्यासंदर्भात या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन केले गेले. त्यामुळे आजही या रस्त्याची मजबुती कायम आहे, असे बहुतांश ठेकेदारांचे मत आहे.
वारंवार खोदला जात नाही रस्ता
बरेच रस्ते आडवे, उभे असे वारंवार खोदले जातात. कधी उत्सवाचे मंडप, कधी वेगवेगळ्या कामांसाठी म्हणून खोदकाम होते. तसे या रस्त्यावर सहसा होत नाही. आडवा म्हणजे एका बाजूपासून ते दुसऱ्या बाजूपर्यंत असे खोदकाम तर या रस्त्यावर होतच नाही, तसेच सुरुवातीची बांधणी मजबूत आहे, हेही कारण आहेच. इतर रस्त्यांवर खड्डे पडतात, कारण त्यांची सतत खोदाई होते व नंतर ते नीट बुजवत नाहीत.- व्ही.जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथविभाग.
आग्रह धरला, तर हाेतात आरोप
ठेकेदार नीट काम करत नाहीत. त्याविषयी तक्रार केली की, पदाधिकारी, लाेकप्रतिनिधींकडून दबाव येतात. गुणवत्ता असलेले काम हवे असेल, तर त्यासाठी गुणवत्ता असलेले दर्जेदार साहित्य वापरावे लागते. त्याचा आग्रह धरला की, आमच्यावरच आरोप केले जातात, असे महापालिका पथविभागातील अभियंते सांगतात.
टक्केवारीने गुणवत्तेवर टाच
टक्केवारी सांभाळण्यातच आमचे प्रॉफिट जाते. ते वाचवायचे असेल, तर नाईलाजाने साहित्यात तडजोड करावीच लागते. सरळ व्यवहार महापालिकेत कधीच होत नाहीत, असे रस्त्यांची कामे घेणारे ठेकेदार सांगतात.
रस्ता वारंवार खोदला जात नाही.
बरेच रस्ते आडवे, ऊभे असे वारंवार खोदले जातात. कधी ऊत्सवाचे मंडप, कधी वेगवेगळ्या कामांसाठी म्हणून खोदकाम होते. तसे या रस्त्यावर सहसा होत नाही. आडवा म्हणजे एका बाजूपासून ते दुसर्या बाजूपर्यंत असे खोदकाम तर या रस्त्यावर होतच नाही. त्याची सुरूवातीची बांधणी मजबूत आहे हेही कारण आहेच. इतर रस्त्यांवर खड्डे पडतात कारण त्यांची सतत खोदाई होते व नंतर ते नीट बूजवत नाहीत.- व्हि. जी. कुलकर्णी- मूख्य अभियंता, पथविभाग
पदाधिकाऱ्यांचा दबाव
ठेकेदार नीट काम करत नाहीत. त्याविषयी तक्रार केली की पदाधिकारी, पुढारी यांचे दबाव येतात. गुणवत्ता असलेले काम हवे असेल तर त्यासाठी गुणवत्ता असलेले दर्जेदार साहित्य वापरावे लागते. त्याचा आग्रह धरला की आमच्यावरच आरोप केले जातात.- महापालिका पथ विभागातील अभियंते
टक्केवारीने गुणवत्ता संपवली
टक्केवारी सांभाळण्यातच आमचे प्रॉफिट जाते. ते वाचवायचे असेल तर मग नाईलाजाने साहित्यात तडजोड करावीच लागते. सरळ व्यवहार महापालिकेत कधीच होत नाहीत.- रस्त्यांची कामे घेणारे ठेकेदार