लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हैदराबाद मुक्तिसंग्रामात काँग्रेस विचारांचा मोठा वाटा आहे, या संघर्षाला हिंदू-मुस्लिम स्वरूप आले नाही, याचे कारण काँग्रेसच आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.
शहर काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी दुपारी काँग्रेस भवनमध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सबनीस यांचे व्याख्यान झाले. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
सबनीस म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, उद्धवराव पाटील, गंगाप्रसाद अग्रवाल, गोविंदभाई श्रॉफ अशा गांधी विचारांवर निष्ठा असलेल्या नेत्यांमुळे हा संघर्ष हिंदू व मुसलमान असा झाला नाही. सामान्य माणसांनीही गांधी विचार मान्य केला हेच यातून दिसते. मराठवाड्यातील जनतेला उर्वरित महाराष्ट्राने विकासाच्या बाबतीत सोबत घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्यक्रमात आदरपूर्वक स्मरण करण्यात आले. प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी प्रास्तविक केले. किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष हनुमंत पवार यांनी आभार व्यक्त केले.