इंदापूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध देखील लागले गेले आहे. मात्र तरीदेखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. त्यामुळे राज्यातील काही मंत्र्यांकडून पुन्हा लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहे. आता मात्र ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर होणार नाही असे मोठे विधान व्यक्त केले आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने शेतकरी राजा शंभर रुपयांची वस्तू ७० रुपयाला विकतो आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, असे स्पष्ट संकेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरात दिले.
इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात वाढत्या कोरोना संदर्भात आढावा बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भगवान पवार, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत महाजन यांसह विविध अधिकारी उपस्थित होते.
भरणे म्हणाले, राज्यात लॉकडाऊन होणार नाही, परंतु जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने निर्देशित केलेले नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू न देणे, घराबाहेर फिरताना मास्कचा वापर केला पाहिजे. जर लॉकडाऊन जाहीर झाले तर काहीजण विनाकारण लॉकडाऊनच्या नावाखाली साठेबाजारी करतात. शेतमालाचे बाजार भाव पाडतात असे प्रयत्न होत असतात.त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही.
इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात ७६ तर शहरात ३२ रुग्ण हे कोरोनाबाधित आहेत. अशा १०८ व्यक्तींवर सध्या उपचार सुरु आहे. ग्रामीण भागातील भिगवण आणि पळसदेव या दोन गावातून रुग्णांची संख्या अधिक आहे. तर शहरातील आंबेडकरनगरमध्ये बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही.असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम शासन प्रभावीपणे राबविणार आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर मागील दोन दिवसात हाॅटस्पाॅट असणाऱ्या ठिकाणच्या नव्वद व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर आठ जण बाधित आढळले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय,कोवीड केअर सेंटर आदी या ठिकाणचे कमी करण्यात आल्याचे मनुष्यबळ पुन्हा वाढवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. _____________
इंदापूर शहराला मिळणार स्वतंत्र अद्यावत रुग्णवाहिकाशहराला सध्या रुग्णवाहिकेची कमतरता भासत आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी रूग्णवाहिकेची नितांत गरज पाहून नागरिकांसाठी अद्यावयत अशी सर्व सुविधांयुक्त प्रणाली असलेली रुग्णवाहिका तातडीने स्वतःच्या निधीतून देणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठकीत घोषित केले.