इंदापूर : ज्या महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करता, त्याच सरकारमधील एक घटक घेऊन राज्यातील सरकार बनवता आहात. ते तुमच्या बरोबर गेले तर भ्रष्टाचारी नाहीत. त्यांना सौ खून माफ, पण बाहेर राहिले तर भ्रष्टाचारी, हा न्याय की अन्याय हे मला सांगा, असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना आज (दि.१८) केला.
सुळे म्हणाल्या की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा काल महाराष्ट्रात आले होते. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेले. त्याच्याबद्दल ते एकही शब्द बोलले नाहीत. मात्र, महाविकास आघाडी सरकारने भ्रष्टाचार केला, असे ते म्हणाले. त्यांच्याबरोबर गेले की सौ खून माफ व खोक्याबद्दल मात्र विचारू नका, असे वातावरण तयार केले जाते. बैलगाडा शर्यतीला पुन्हा परवानगी दिल्याबद्दल सुळे यांनी या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी अमोल कोल्हे व इतरांनी न्यायालयात धाव घेतली होती. बैलगाडा शर्यत व कुस्ती या दोन्ही बाबी आपल्या मातीशी जोडल्या गेल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान जे पी नड्डा पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ७० वर्षात काँग्रेसने केले नाही ते ९ वर्षात मोदी सरकारने केले असे ते म्हणाले. तसेच राज्य सरकारच्या कामाचेही मोदी यांनी कौतूक केले. मविआ सरकारच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याची टीका त्यांनी केली. त्याला सुळे यांनी उत्तर दिले आहे.