पुणे : ज्या लोकांची तोंड वर करुन बोलायची हिंमत नव्हती़ ते वाट्टेल ते बोलू लागले, ते सहन होत नव्हते. व्यवसायात काही चुकीचे निर्णय झाल्याने आर्थिक नुकसान झाले होते. त्याच्या तणावातून आत्महत्येचा विचार आल्याने घरातून निघून गेलो होतो. पण बाहेर पडल्यावर कुटुंबाचा विचार मनात आल्याने आत्महत्येचा विचार दूर सारला. पण पुण्यात परत न येण्याचा विचार होता, असे प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर यांनी सांगितले.
पुणेपोलिसांच्या पथकाने गौतम पाषाणकर यांना जयपूर येथील चंद्रगुप्त फोर्ट या हॉटेलमधून मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांना बुधवारी सायंकाळी पुण्यात आणण्यात आले़ यावेळी पाषाणकर हे पत्रकारांशी बोलत होते.
पाषाणकर यांनी सांगितले की, व्यवसायात काही चुकीचे निर्णय घेतले गेले. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले होते. त्यातून गेल्या २ -३ महिन्यांपासून ताणतणावात होतो.त्यातून माझ्यावर मानसिक भडीमार झाला. कुठलीही परिस्थिती साथ देत नव्हती. किरकोळ रक्कमेसाठी लोक बोलू लागल्याने त्याचा मानसिक त्रास झाला. ते सहनशीलतेच्या बाहेर होते. त्यातूनच आत्महत्येचा विचार करुन पुण्यातून कोल्हापूरला गेलो़ तेथून बसने बंगलोर व तेथून तिरुपती बालाजी करीत कन्याकुमारीपर्यंत गेलो होतो़ या प्रवासादरम्यान शांतपणे विचार करत गेलो. तेव्हा कुटुंबाचा विचार मनात आला. हे आपले काम नाही, असे मनाने घेतले. पण पुण्यात परत येण्याचा विचार नव्हता. त्यामुळे मी बसने फिरत राहिलो. पोलीस आले नसते तर दुसऱ्या दिवशी आपण उदयपूरला निघून जाणार होतो.पुण्यातून निघताना ९० हजार रुपये बरोबर घेतले होते. छोट्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचा़ साधे जेवण घ्यायचे़ बसने फिरायचे़ खूप विचार करायचा असा दिनक्रम सुरु होता, असे त्यांनी सांगितले.
गौतम पाषाणकर यांचे चिरंजीव कपिल पाषाणकर यांनी सांगितले की, आम्ही स्वतंत्रपणे व्यवसाय करतो. मी महत्वाच्या निर्णयाच्या वेळी वडिलांचा सल्ला घेतो. आमची ८०० कोटींची उलाढाल होती. आमची मोटारीची डिलरशीप बंद झाली. त्या कठीण काळामधून बाहेर पडलो होतो. पण वडिलांनी त्यांच्या आर्थिक अडचणी, मानसिक स्थितीची कधी माहिती दिली नाही. त्यांना आता व्यवसायातून तुम्ही रिटायर व्हा. पुढील ६ महिन्यात सर्व स्थिर स्थावर करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
पोलीस इतका शोध घेतील असे वाटले नव्हतेआपण घरातून निघून गेल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार होईल़ पोलीस शोध घेतील, याची कल्पना होती. परंतु, पोलीस इतका शोध घेतील, असे वाटले नव्हते, असे गौतम पाषाणकर यांनी सांगितले.आपण महाराष्ट्राबाहेर होतो. तसेच बरोबर मोबाईल अथवा कोणाशी संपर्क नसल्याने आपला इतका ठिकाणी शोध घेतला जात असल्याचे समजले नसल्याचे त्यांनी सांगितले............
पोलिसांनी दिला मानसिक आधारकपिल पाषाणकर यांनी सांगितले की, वडील निघून गेल्यावर पोलिसांनी विशेष पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, सहायक आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांनी मोठा मानसिक आधार दिला.
यासंबंधी एका राजकीय व्यक्तीचा हात असल्याचे सांगितले जात होते. त्याविषयी कपिल पाषाणकर यांनी सांगितले की, वडील निघून गेल्यानंतर आम्ही सर्व गोष्टीचा विचार केला. त्यांचे मोठ्या लोकांशी व्यवहार होते़ त्यांना कोणी त्रास दिला़ रस्त्यात गाडी अडविणे, असे प्रकार घडले होते. त्यातून संबंधित व्यक्तीला फोन केला. तेव्हा त्याने आपण मंत्रालयात असून अजून ३ दिवस तिथेच असणार आहे, असे उत्तर दिले होते. त्यामुळे तपासाच्या दृष्टीने पोलीस आयुक्तांना भेटून अर्ज दिला होता. परंतु, आता वडिलांशी चर्चा केल्यावर त्यांच्या निघून जाण्यामध्ये असे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. ़़़़़़़पोलिसांची धावपळया सर्व प्रकारात शहर पोलीस दलाची चांगलीच धावपळ झाली. शिवाजीनगर पोलिसांचे पथक, गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक महिन्याभर त्यांच्या कोल्हापूरसह कोकणात शोध घेत होते. अधिकारी व कर्मचारी असे १५ जणांचे पथक अनेक ठिकाणी जाऊन शोध घेऊन आले होते. त्याशिवाय कोल्हापूरसह कोकणातील स्थानिक पोलिसांची याकामी मदत घेण्यात आली होती.