पुणे : सध्याच्या काळात महात्मा गांधींचे कौतुक करायचे आणि पंडित नेहरूंवर हल्ला चढवायचा ही धोरणात्मक चौकट रूढ केली जात आहे. गांधींचा आदर करणे भाग आहे. कारण त्यांचे विचार समाजात रूजले आहेत. गांधी नावाची'अँलर्जी’ नव्हे तर ‘भीती’ आहे. त्यामुळे गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांचा इतका उदो उदो केला जातोय की उद्या गांधीजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वीच सदस्यत्व घेतले होते की काय असे वाटू लागेल, असा टोला राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी लगावला. नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्स च्या चौथ्या स्नेहसंमेलनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, गांधीजींचे पणतू तुषार गांधी आणि संयोजक संकेत मुनोत उपस्थित होते. महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यामध्येही अनेकदा वैचारिक मतभेद व्हायचे. तरीही गांधीजींनी नेहरूंची विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजशास्त्रातील दूरदृष्टी पाहून त्यांना वारसदार नेमले. त्यामुळे गांधी आणि नेहरूंना वेगळे काढता येणार नसल्याचे सांगून केतकर म्हणाले, नेहरू लोकांना कधी सांगायचे नाहीत. काँग्रेसला मत द्या पण धोके कुणाकडून आहेतहे पाहून मतदान करा असे ते म्हणायचे. आपल्यापासून धोका आहे हे ते सांगायचे म्हणून नेहरू परिवारावर हल्ला चढवणे सुरू आहे. त्यामुळेच नेहरूंबददल कितीतरी चुकीच्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. 2014 मध्ये मोदी यांनी नियोजन आयोग रद्द करण्याची घोषणा केली. पण हे त्यांना माहिती नाही की हा आयोग केवळ नेहरूंनी नव्हे तर बोस, लोहिया आणि नेहरू यांनी मिळून स्थापन केला होता. एक अज्ञानी आपला शत्रू आहे. अज्ञानी माणूस सोपा असतो.ज्याला आपण हुशार असल्याचे वाटतो. त्यालाच आव्हान द्यावी लागतात.त्यामुळे आगामी काळात आपल्याला संघर्ष करायचा आहे. पण नेहरूंना वगळून गांधी विचार मांडायचा नाहीये. मोदी सरकारला सर्वधर्मसमभाव आणि स्वातंत्र्य चळवळचं नष्ट करायची आहे. हा धोका लक्षात घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ’सोशल सिक्युलँरिझम’ हा शब्द संविधानात आणला. हा गांधी आणि नेहरू विचारांचा परिपाक असल्याचे त्यांनी सांगितले.
तुषार गांधी म्हणाले, सध्याच्या काळात सीएए, एनआरसी विरोधात केवळ मेणबत्ती लावून उपयोग नाही. आता क्रांती ची मशाल पेटवावी लागेल. संविधानाचा आत्मा वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल नागरिकांमध्ये असहकाराची चळवळ रुजवावी लागेल. कोणताही सत्याग्रह परवानगी ने करता येणार नाही. अशी क्रांती होणार नाही. आता आपल्याला त्याला व्यक्त होण्यासाठी चिथवावे लागेल. बापूंना शब्दातून बाहेर काढून प्रत्यक्ष जीवनात त्याचा वापर कसा करायचा हे सांगावे लागेल. बापू जिवंत आहेत हे सांगावं लागेल तेव्हा गोडसे यांचे आकर्षण कमी होईल. निरंजन टकले यांनीही आपले विचार व्यक्त केले.