CM Majhi Ladki Bahin Yojana ( Marathi News ) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मागील काही महिन्यांपासून राज्यभरात मोठी चर्चा आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत जमा झाल्याने सरकारसाठी ही योजना गेमचेंजर ठरणार का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसंच दुसरीकडे, राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीपूर्वी ही योजना आणली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल आळंदी इथं झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू करण्यामागील कारण सांगितलं आहे.
"आम्ही नियोजन करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. आपणदेखील सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. आपल्यालाही गरिबी माहिती आहे. आपल्या स्तरावरचे अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते. म्हणून ही योजना सुरू केली. माझी लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभराची तरतूद केली असून दरमहा निश्चित रक्कम मिळणार आहे," असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते रविवारी आळंदी येथे फ्रुट वाले धर्मशाळा येथे झालेल्या ह.भ.प मारोती महाराज कुरेकर यांच्या ९३ व्या व ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ह.भ.प कुरेकर महाराज यांना शांतीब्रह्म पुरस्कार आणि ह.भ.प. ढोक महाराज यांना तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संतपूजन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी वाचला योजनांचा पाढा
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, "लाडकी बहीण योजनेसोबतच आपलं सरकार लेक लाडकी लखपती योजना, मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय, एस. टी. प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आदी योजना राबवत आहे. शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ आदींसाठी आतापर्यंत १६ हजार कोटी रुपये नुकसान भरपाई दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीला राज्याच्या नमो महासन्मान योजनेची ६ हजार रुपयांची जोड देऊन वर्षाला एकूण १२ हजार रुपये देण्यात येत आहेत. १ रुपयात पीक विमा देणारे हे देशातील पहिले सरकार असून ७.५ एच. पी. पर्यंतच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने एकीकडे बंद पडलेले प्रकल्प सुरू केले. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक, अटल सेतू असे विकासाचे प्रकल्प राबवित असून हाताला रोजगार मिळण्याच्या दृष्टीने नवीन उद्योग आणण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्र उद्योग, परदेशी गुंतवणुकीमध्ये आघाडीचे राज्य असून देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ५२ टक्के परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण तसेच विद्यावेतनही मिळणार आहे. यात आतापर्यंत १ लाख ५० हजार उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यांना नियुक्ती पत्रे दिली आहेत. त्यामुळे एकीकडे विकास कार्य आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना अशी सांगड घालण्याचे काम सरकार करत आहे," असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या कामांबाबत माहिती दिली.