मंचर : झोपेचे सोंंग घेतलेले काही लोक तुम्ही, २७ वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारीत आहेत. त्यांना त्यांच्या विकास आराखड्याबाबत काही विचारले की राग येतो. तुम्ही चौदा वर्षे आमच्याबरोबर होता तेव्हा तुम्हाला काहीच कळले नाही का? असा सवाल करून १३ वर्षांच्या खासदारकीच्या काळात तुम्ही काय काम केले, त्याचे उत्तर जनतेला द्या, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले. शिवसेना व भाजपाचा कलगितुरा राज्यात सुरू असून वेळप्रसंगी मध्यावधी निवडणुकांची तयारी करावी लागेल, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता सभा मंचर येथे झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मागील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीला याच ठिकाणी सांगता समारोपाची सभा घेऊन आवाहन केले. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या ४ व पंचायत समितीच्या ८ जागा निवडून आल्या. या विजयाची पुनरावृत्ती करा, असे आवाहन त्यांनी केले. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेपुढे जात आहोत, मात्र काहीजण तुम्ही काय केले आम्ही काय केले, असे म्हणून वाद घालता आहात. महाराष्ट्राच्या विकासाचा हाच का अजेंडा, असे सांगून वळसे पाटील म्हणाले, निवडणुकीनंतर सरकार चालेल की नाही, याबाबत साशंकता आहे. शिवसेना-भाजपा एकमेकांची लक्तरे बाहेर काढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीची तयारी करावी लागेल असे ते म्हणाले. (वार्ताहर)
मग तुम्ही चौदा वर्षे काय केले? : वळसे पाटील
By admin | Published: February 20, 2017 2:04 AM