मुंबई - माजी आयपीएस पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकातून पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा मीरा बोरवणकर लिखित 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या 'द मिनिस्टर' या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मीरा बोरवणकर यांच्यावर टीका केली जात आहे. तर, विरोधकांकडून अजित पवारांच्या चौकशीची मागणी होत आहे. आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जमिनीच्या लिलाव करण्याच्या निर्णया संदर्भात आरोप केले. त्यावर, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही ईडी आणि फडणवीसांकडे बोट दाखवले आहे. आता, ईडी काय करेल, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला होता. तसेच, देवेंद्र फडणवीसांनी अशा भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेतलंय, असेही ते म्हणाले होते. आता, याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मी बिल्डींग व्यवसायाच्या क्षेत्रात नाही, मला त्याबद्दल अधिक माहिती नाही. पण, जमिन कोणी कोणाची कोणाला दिली, त्याचं काय झालं, याबाबत शहानिशा सरकारने करावी. त्यासाठी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच, माझी चौकशी सुरू आहे, बारामती अॅग्रोवरुन माझ्याकडेही चौकशी केली जात आहे. मग, कोणाचीही चौकशी करायला काय हरकत आहे, असेही त्यांनी म्हटले. पुण्यात युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने रोहित पवार आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. तसेच, या प्रश्नांसोबतच युवा वर्गाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर चर्चा झाली पाहिजे, असेही रोहित पवार यांनी म्हटले. तर, सरकारकडून दडपशाहीचं राजकारण सुरू असून युवा वर्गांचे फेसबुक अकाऊंट बंद केले जात आहेत. सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचं काम केलं जातंय, असा आरोपही रोहित पवार यांनी केला.
सुप्रिया सुळेंनीही दिलं उत्तर
या संदर्भात बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी अजुनही ते पुस्तक वाचलेलं नाही. मला वाटतं यावर बोरवणकरच यावर स्पष्टीकरण देऊ शकतात, आरोप करणारे लेखक आहेत असं दिसतंय. ते पुस्तकच मी अजुनही वाचलेलं नाही, त्यामुळे मी यावर काहीही बोलू शकत नाही, असंही खासदार सुळे म्हणाल्या.
मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात धक्कादायक खुलासे
पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की, पुण्याच्या पालकमंत्र्यांना एकदा भेटा. येरवडा पोलिस ठाण्याच्या जमिनीसंबंधित विषय आहे. त्यानुसार मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे येरवडा पोलिस ठाणे परिसराचा नकाशा होता. ते म्हणाले की, या जमिनीचा लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल, त्याच्यासोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. मी पालकमंत्र्यांना सांगितले की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही.
दादां’नी केले आरोपांचे खंडन
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. अशा प्रकारच्या जमिनींचा लिलाव करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना नाहीत. अशी प्रकरणे महसूल विभागाकडे जातात आणि नंतर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेते. रेडिरेकनरनुसार मंत्रिमंडळ जमिनीची किंमत ठरवते. त्यामुळे या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही, असे अजित पवार म्हणाले.