कुजबुजसाठी
एरवी पालिका भवन नाहीतर भाजपचे जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालय राजकीयदृष्ट्या चर्चेत असते. मात्र, मागील दोन आठवड्यांपासून चर्चा आहे ती ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसच्या शहर कार्यालयाची. उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही भेटी दिल्या. स्वपक्षाचे नेते पदाधिकारी तर आलेच पण थेट विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नेतेही हे कार्यालय पाहायला आले. खासदार, महापौर, शहराध्यक्ष, माजी आमदार, विद्यमान पदाधिकारी आणि नगरसेवक थेट राष्ट्रवादीचा पाहुणचार झोडून गेल्यावर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा न होते तो नवलच.
या भेटीनंतर रात्री फोनवर सोमाजी आणि गोमाजी एकमेकांशी बोलले. सोमाजी म्हणाला, ''काय तुमच्याकडे आमची फौज आली होती म्हणे? गोमाजी म्हणाला, ''होय. मस्त फड रंगला होता.'' सोमाजी, ''आयला गोमाजी तू आणि मी परवाच किती भांडलो लेका? तुझा नेता मोठा का माझा नेता मोठा यावरून.'' गोमाजी उत्तरला, ''होय रे, पार हाणामारीच व्हायची बाकी होती. एरवी एकमेकांवर राजकीय विषयांवरून आरोपांच्या फैरी झाडणारे, कडवट टीका करणारे एकाच टेबलावर बसून मस्त गप्पांचा फड रंगवतात''. सोमाजी, एकमेकांचा चहा तेव्हा अजिबात 'कडू' लागत नाही. कोणाच्या कारखान्याची साखर कोणाला गोड लागेल काही सांगता येत नाही. आता आपण भांडण विसरून कधी घ्यायचा एकत्र चहा?