पुणे : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. केंद्र सरकारने ईडब्ल्यूएस प्रवर्गाला १० टक्के आरक्षण देत ५० टक्क्यांची अट ओलांडली आहे. तर मग मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ही अट ओलांडायला काय अडचण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
काॅंग्रेस भवन येथील पत्रकार परिषदेत चव्हाण बाेलत हाेते. यावेळी प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार माेहन जाेशी, दीप्ती चवधरी, रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, गाेपाळ तिवारी, विठ्ठलराव गायकवाड आदी नेते उपस्थित हाेते.
चव्हाण म्हणाले, शिंदे-फडणवीस- पवार सरकारने मराठा आरक्षणाबाबत टाेलवाटाेलवी करू नये तसेच समित्यांचे गुऱ्हाळ न घालता ठाेस भूमिका घेणे गरजेचे आहे. अतिरिक्त आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तर आम्हीही त्याला पाठिंबा देऊ. मराठा आंदाेलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चाैकशी करावी. लाठीचार्जचे आदेश काेणी दिले? काेणत्या स्तरावर दिले गेले? याची चाैकशी हाेईपर्यंत गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा काेणताही अधिकार नाही, असेही ते म्हणाले.
देशात बेसावधपणे निवडणुकांची शक्यता
इंडिया आघाडीमुळे भाजपमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांकडून ज्याप्रकारे गुप्तता बाळगण्यात येत आहे त्यावरून देशात बेसावधपणे निवडणूका घेण्याचा प्रयत्न हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रकाश आंबेडकरांचे स्वागत आहे
ॲड. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीमध्ये यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. मात्र, याबाबत काॅंग्रेस पक्ष एकटा निर्णय घेऊ शकत नाही. इंडिया आघाडीची समन्वय समिती ताे याबाबत निर्णय घेईल.
शेतकऱ्यांच्या पाेटावर पाय का देता?
कांदा निर्यात हाेऊ नये म्हणून चाळीस टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय चुकीचा आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दाेन पैसे जास्त मिळत असतील तर तुम्ही त्याच्या पाेटावर का पाय देत आहात? असा प्रश्न उपस्थित करीत केंद्राने निर्यात शुल्क ताबडताेब रद्द करावे. शेतकऱ्यांकडून २४ रुपये किलाे दराने कांदा विकत घेण्याचा निर्णय मान्य नाही. शेतकऱ्यांना मुक्तपणे कांदा निर्यात करू द्या. राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती असून, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, असेही चव्हाण म्हणाले.