पुणे : एल्गार परिषद प्रकरणात पोलिसांना काही कागदपत्रांमध्ये टोपण नावे आढळली आहेत. त्यानुसार पोलिसांनी कॉम्रेड मंगलू हे मिलिंद तेलतुंबडे, कॉम्रेड रोना हे रोना विल्सन असल्याचा अर्थ काढला आहे. मात्र, काही पत्रात कॉमेड प्रकाश असा स्पष्ट उल्लेख आहे. यावर पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांची साधी चौकशी देखील का केली नाही? असा सवाल बचाव पक्षाच्या वतीने रोहन नहार यांनी जामिनाच्या सुनावणी दरम्यान केला. सध्या सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात एल्गार परिषद प्रकरणात अटक केलेल्यांच्या जामिनावर सुनावणी सुरू आहे.
या वेळी तेलगु कवी वरवरा राव व रोना विल्सन यांच्या वतीने रोहन नहार यांनी बाजू मांडली. नहार म्हणाले,‘तपासादरम्यान पोलिसांनी अनेक कागदपत्रे, पत्रे जप्त केली आहेत. त्यात पाठविणारा व ज्याला पाठविले हे अनोळखी आहेत. तपास अधिकाऱ्याकडे अटक केलेले व पत्रात टोपण नाव असणारे हेच आहेत असा दाखविणारा एकही पुरावा नाही. इंडियन असोसिएशन पिपल्स लॉयर्स (आयएपीएल) ही सीपीआय (एम) ची फ्रंटल आॅर्गनायझेशन असल्याचे सांगतात. मात्र, त्यावर सरकाने बंदी घातलेली नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.शोमा सेन यांच्याकडून जप्त केलेल्या वस्तूमध्ये काहीही सापडले नाही.
पोलिसांना चार पत्रे सापडली असून ती कोणी पाठविली याचा उल्लेख नाही. सेन यांच्या नावाचा उल्लेख आहे. अत्याचारित स्त्रियांचा आवाज सेन उठवतात. यात कुठलेही शस्त्र वापरल्याचा पुरावा नाही हा गुन्हा होवू शकत नाही. तसेच एल्गार परिषदेतमुळे भीमा कोरेगाव येथे दंगल झाल्याचे सांगत असताना कोणाचेही म्हणणे नोंदवले नाही, असेही बचाव पक्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ आॅक्टोबरला होणार असून, सुधा भारद्वाज, अरूण फरेरा, व्हर्नान गोन्साल्वीस यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केल्याचे अॅड. राहुल देशमुख यांनी सांगितले.