शरद पवारांना भावी पंतप्रधान, मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 12:19 AM2018-12-17T00:19:20+5:302018-12-17T06:51:13+5:30
बारामती तालुक्यातील पणदरे येथील खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी शिवसेनेवर राजकीय भूमिकेबाबत पवार यांनी टीका केली.
बारामती : शिवसेना आणि भाजपा एकाच माळेचे मणी आहेत. उद्धव ठाकरे भाजपामुळे २५ वर्षे सडली, असं सांगतात. मग त्यांच्यासोबत कशाला राहता. यांचं नेमकं काय चाललंय, हेच कळत नाही, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. तसेच, कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंतप्रधान व आपला भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू नये, असेही म्हटले.
बारामती तालुक्यातील पणदरे येथील खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी शिवसेनेवर राजकीय भूमिकेबाबत पवार यांनी टीका केली. यावेळी पवार यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेत कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंतप्रधान व आपला भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू नये. पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचं राजकारण होतं. या पाडापाडीमुळेच आमची माती झालीय, असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला.
पवार म्हणाले, की कार्यकर्त्यांनी अगोदर आघाडीचं बहुमत कसं मिळेल, यावर लक्ष द्यावे. पाच राज्यांतील निवडणूक निकालात भाजपाची पीछेहाट झाली आहे. त्यामुळे कर्जमाफी देऊन गमावलेला जनाधार मिळवण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार थातूरमातूर उत्तरं देत आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शेवटी कुणी काय करावं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न असल्याचेदेखील पवार यांनी नमूद केले.
...अटेन्शन...ब्रेकिंग न्यूज
अजित पवार यांच्या भाषणादरम्यान त्यांचा मिश्कीलपणा अनेक वेळा नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी अनुभवला आहे. आज प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनीदेखील पवार यांच्या मिश्कीलपणाचा प्रत्यय घेतला. पणदरे येथील कार्यक्रमात पवार यांनी भाषणादरम्यान वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांकडे पाहत, अजित पवार काय बोलतात, यावरच लक्ष असतं. अटेन्शन... ब्रेकिंग न्यूज... असं म्हणत मिश्कील टिपणी केली. पवार यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.