पुणे : लॉकडाऊनमुळे अगोदरच वैतागले पुणेकर आता वाहतूक पोलिसांच्या दंडवसुली कारवाईने त्रागा करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे वाहतूक विभागाकडून प्रलंबित दंडाची वसुली सुरू करण्यात आली आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर वसुली करण्यास काही हरकत नव्हती. आता एवढ्या तातडीने दंड वसुलीचे कारण काय ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. एकीकडे पगार कपात, कर्मचारी कपात, जेमतेम पैसे शिल्लक जवळ असणाऱ्या नागरिकांना दंड भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी देखील तुरळक प्रमाणात रस्त्यावर वाहने फिरत होती. तेव्हा तर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केली नाही. शासन लॉकडाऊन उठवून काम सुरू करण्यास सांगत आहे. दुसरीकडे प्रलंबित दंडवसुलीच्या नावाने कारवाई केली जात आहे. हे दुटप्पी धोरण असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक महेश डोके याने दिली आहे. याबाबत लोकमतशी बोलताना सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी सांगितले, एकीकडे तुरूंगातून जामिनावर कैदी सोडले जात आहेत. लॉकडाऊनसारखी गंभीर परिस्थिती असताना एवढ्या तातडीने दंडात्मक कारवाई का केली जात आहे ? वाहतुकीचा नियम मोडणारा तुरुंगातील गुन्हेगारापेक्षा मोठा गुन्हेगार आहे का ? असा प्रश्न पडतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता बँका बंद आहेत, पगार कपात, कर्मचारी कपात सुरू असताना नागरिकांना वाहतुक शिस्त लागावी यासाठी दंड वसुली करणे डोकेदुखी ठरत आहे. याची काही गरज नाही. सगळी परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर दंडवसुली करता येईल. आता ती थांबवणे आवश्यक आहे.
* पोलिसांनी नेमकं काय करायचं हे सांगा. लोकांना चांगलं सांगून कळत नाही. घराबाहेर पडू नका म्हटल्यावर ते पडणार, बाहेर जाणार, पोलिसांच्या जीवाला देखील धोका आहे हे कुणी लक्षात घेणार आहे की नाही ? दंड वसुली का करतोय हे लक्षात घ्या. त्यानिमित्ताने रस्त्यावरील गर्दी कमी होईल. मोठ्या संख्येने विनाकारण नागरिक फिरत आहे. कोरोनोचा संसर्ग यामुळे वाढतो आहे. जो दंड यापूर्वी भरला नाही तो वसूल केला जात आहे. त्यात जास्त पैसे आकारले जात नाही. तसेही वेळेत दंड भरल्यास कारवाई करण्याची गरज पडत नाही. नागरिकांनी उगाच बाऊ करू नये. - पुणे पोलीस वाहतूक प्रशासन