भानुदास पऱ्हाड -
आळंदी : चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'लॉकडाऊन'चे नियम शिथील न झाल्यास शासनाच्या आदेशाचे पालन आणि वारकऱ्यांचे आरोग्य जपत आषाढी वारी मोजक्याच वारकऱ्यांसह होणार असल्याचे आळंदी देवस्थानने नुकतेच स्पष्ट केले आहे. यापार्श्वभूमीवर आळंदीकर ग्रामस्थांनीही माउलींचा सोहळ्याचे प्रस्थान जेष्ठ वद्य अष्टमीला (१३ जूनला) न करता आषाढ शुद्ध दशमीला अर्थातच ३० जूनला करून यंदाची पायीवारी अवघ्या वीस वारकऱ्यांसमवेत पार पाडण्याची लेखी सूचना मंदिर देवस्थानकडे केली आहे. सोबत सह्यांचे निवेदनही आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे - पाटील यांना आळंदीकरांनी दिले आहे. यंदा कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशावर महामारीचे संकट आले आहे. महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर आळंदीलगत च?्होली बु., मोशी आणि दिघीतही कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आळंदीत आषाढी वारी भरेल की नाही ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी आळंदी देवस्थानने आषाढी वारीसंदर्भात प्रमुख घटकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. त्याअनुषंगाने यंदाच्या वर्षी सोहळा कशा स्वरूपात पार पाडावा याबाबत दिंडीकरी, फडकरी व वारकऱ्यांकडून सूचना मागविल्या होत्या. यापार्श्वभूमीवर शनिवारी (दि.९) आळंदी ग्रामस्थांनी देवस्थानला लेखी निवेदन दिले. चालू वर्षीचा सोहळा सुरक्षेच्या कारणास्तव अत्यंत साधेपणाने व शासनाच्या नियमांना अधिन राहून पार पाडावा. वारीचा ऐतिहासिक सोहळा असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तो साजरा होणे अपेक्षित आहे. देशातील सध्याची आपत्कालीन व्यवस्था पाहता माउलींचा आषाढी वारी सोहळा हा मुख्य १५ ते २० व्यक्तींच्याच समवेत व्हावा. सोहळ्यात पालखी सोहळा मालक, प्रमुख विश्वस्त, पालखी सोहळाप्रमुख, चोपदार, मानकरी, शिपाई, दिंडीकरी, विणेकरी, टाळकरी, पखवाद वादक, झेंडेकरी, तुळस घेणारी महिला वारकरी आणि पुजारी अशा मोजक्याच लोकांचा सहभाग असावा. तसेच आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे ३० जूनला सकाळी सहा वाजता माउलींचे मंदिरातून साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान करावे. माउलींच्या पादुका ट्रकमधे किंवा सजवलेल्या रथात ठेवाव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
.........
थेट पंढरपुरात प्रवेश करावा... आषाढी वारी सोहळा वाटेत कोठेही न थांबवता थेट पंढरपूरला थांबवावा. शासनाच्या नियमानुसार आषाढी एकादशीला (दि.१ जुलै) प्रदक्षिणा व द्वादशीचे पारणे फेडून पुन्हा दुपारी आळंदीकडे प्रयाण करावे. सायंकाळी अथवा रात्री उशिरा आळंदीत माऊलींच्या मंदिरात सोहळ्याची साधेपणाने सांगता करावी असेही आळंदी ग्रामस्थांचे म्हणणे आहे.