पुणे : केरळमध्ये अालेल्या संकटावर देशभरातून मदतरुपी मात करण्यात येत अाहे. प्रत्येकव्यक्ती, संस्था अापअापल्या पद्धतीने केरळच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देत अाहे. त्यात अाता पुण्यातील प्रथारी व्यावसायिकांनी सुद्धा वाटा उचलला अाहे. हातावरचं पाेट असलं तरी अापण भारतीय अाहाेत अाणि या नात्याने अापल्या केरळच्या बांधवांना मदत केली पाहिजे या विचाराने शिवराय विचार पथारी संघटनेतर्फे केरळमधील शंभर पूरग्रस्त कुटुंबांना कपडे पाठविण्यात येणार अाहेत. या मदतीचे स्वरुप अधिक व्यापक करण्यासाठी संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मदत फेरी सुद्धा काढण्यात अाली.
गुरुजी तालीम मंदिरापासून या मदत फेरीचा प्रारंभ झाला. तेथून लक्ष्मी रस्ता, शगुन चौक मार्गे मंडईतील लोकमान्य पुतळयाजवळ या रॅलीचा समारोप झाला. या मदत रॅलीमध्ये रोख रक्कम, कपडे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू स्वीकारण्यात आल्या. यावेळी लक्ष्मी रोड परिसरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांनी देखील विविध स्वरूपात मदत केली. ही सर्व मदत पुणे येथील एफ.टी.आय.आय अर्थात फिल्म ॲन्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये केरळच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या मदत केंद्राकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.