अमोल अवचिते
सासवड : यारे यारे लहान थोर! याती भलते नारी नर ! विठ्ठलाच्या भक्तीत विलीन होऊन अखंडपणे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वारकरी संप्रदाय युवा मंच आणि महाएनजीओ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर प्रबोधन केले जात आहे. या वारीत सातशे वारकरी असून यात तरुणांची संख्या मोठी आहे. वारीचे आठवे वर्ष आहे. युवा वारकऱ्यांच्या माध्यमातून पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची सेवा केली जाते. वैष्णव धर्म जगती ! वारी चुको न दे वारकरी ! वारकरी सेवक पंथावरी! धर्माचे मर्म ! या ओवीप्रमाणे गरजू वारकऱ्यांना कापडी बूट, औषधे, वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. वारकरी सेवा रथाच्या माध्यमातून वारी केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी, भारुडे, भजन, कीर्तन या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले जाते.जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. सहा हजार वेगवेगळ्या रोपांच्या बियांचे वाटप केले आहे.व्यसन मुक्तीवर देखील काम केले जाते. ज्यांना वारीला येता येत नाही अशा भक्तांना व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून वारीचे क्षणाचे फोटो, पाठवले जातात.महाएनजीओ फेडरेशन ने या दिंडीला मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. व्हाट्सएपच्या माध्यमातून युवा पिढीला जोडले आहे. वारीतील दिंडीत जाऊन मदत केली जाते, अशी माहिती वारकरी युवा मंचचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिली. वारी म्हणजे मॅनेजमेंट आहे. अहंकार नाही, धर्म जात नाही, भजन म्हणजेच प्रमाण, सगळे समान आहेत. असेही त्यांनी सांगितले.