कडूस : चांगला माणूस आणि चांगला शिक्षक या दोन्ही बाबी एकत्र येणे अवघड असते़ परिस्थिती आणि जाण यांचा योग्य मेळ बसवून श्रीकांत महाकाळ हे शिक्षकी पेशाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले़ पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना संधी मिळावी़ त्यांचा विकास व्हावा, याकरिता यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवाचे आयोजन शाळा ते जिल्हा पातळीपर्यंत केले जात आहे़ खेड तालुक्यातील मुस्लिम समाज असलेल्या तुरुकवाडीला द्विशिक्षकी लहान शाळा आहे़ या शाळेतील श्रीकांत महाकाळ या शिक्षकाने समाजाकडून दाद मिळावी, अशी नवलाई केलेली आहे़ विद्यार्थीस्तराचा विचार करून संत व त्यांच्या अभंगाची ओळख व्हावी म्हणून इयत्ता तिसरीपासून सरळ व सोप्या भाषेतील अभंग पाठ्यपुस्तकात आहे़ हिंदी, मराठी प्रार्थना, गायन, माध्यान्ह भोजनांच्या वेळी (खाना खानेकी पहिली दुवा) हिंदी श्लोक म्हणण्याची पद्धत सुरू केली़ यातूनच वारकरी संप्रदायातील भजनांचा सराव झाला़ पाठ केलेले अभंग विद्यार्थी गुणगुणू लागले. गुरुजींनी तबल्याची साथ सुरू केली़ हे पाहून पालक आश्चर्यचकित झाले़ संतांच्या विचाराची जाण, धर्माधर्मांतील समानतेचा दुवा यांबद्दल श्रीकांतगुरुजींनी पालकांशी बोलून त्यांचा विश्वास संपादन केला़
शिक्षकाचा सामाजिक परिवर्तनाचा प्रयत्न
By admin | Published: December 24, 2016 6:33 AM