लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माणसाच्या आयुष्यात जी काही प्रलोभन आहेत. त्यापैकी सध्याच्या काळातलं सर्वात मोठं प्रलोभन हे समाजमाध्यमे आहेत. यापासून काही काळ माणूस दूर गेल्यास अंतर्मुख होऊन स्वत:च्या संवेदनांचा विचार करू शकतो. त्यामुळे समाजमाध्यमांपासून दूर राहावे, असा सल्ला प्रसिद्ध अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज यांनी दिला.
मोरपिस फाउंडेशन व उद्वेली बुक्स तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. गौरी जोशी लिखित ‘ट्रंक कॉल टू कृष्णा’ या पुस्तकाचे प्रकाशन यांच्या हस्ते केले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, पालिकेचे उपायुक्त डॉ. राजेंद्र मुठे, डॉ. गौरी जोशी, पुस्तकाचे प्रकाशक विवेक मेहेत्रे उपस्थित होते.
आजच्या काळात ‘ट्रंक कॉल टू कृष्णा’ अशा प्रकारच्या पुस्तकांची गरज असून, माणसाला दिशा देण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरणार आहे, असे डॉ. भारद्वाज यांनी सांगितले.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, कृष्ण ही व्यक्तिरेखा आपण भारताच्या संस्कृतीपासून दूर करू शकत नाही. कृष्ण ही व्यक्ती एक पूर्ण पुरुष आणि मर्यादा पुरुषोत्तम होती. अनेकांना आजही त्या व्यक्तीची ओढ आहे. कृष्ण आपल्याला जगण्याचे भान देत राहतो, मग ते अध्यात्मातून असेल किंवा अन्य कोणत्याही मार्गातून असेल.
डॉ. जोशी यांनी कृष्णाच्या माध्यमातून मांडलेली तत्त्वं ही आजच्या काळात अनुकरणीय आहेत, यात शंका नाही. डॉ. गौरी जोशी यांनी पुस्तकामागची भूमिका मांडली. अनघा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.