पुणे : स्त्रीच्या कार्यकर्तुत्वाला, जिद्दीला सलाम करण्याचा दिवस अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन! ८ मार्चच्या या ‘मुहुर्ता’वर विविध माध्यमांतून तिच्यावर शुभेच्छांची अक्षरश: बरसात झाली. यामध्ये सोशल मीडिया सर्वाधिक हिट ठरला. विविध मेसेज, फोटो, कविता, डीपी, स्टेटस आदींच्या माध्यमातून फेसबूक, व्हॉटस अॅपमध्ये नेटिझन्सनी महिला दिन साजरा केला. मैदानावरील शर्यतीत सहभागी झालेल्या पुरुषांसमोरील मोकळा रस्ता आणि स्त्रीच्या वाटेतील अडथळे सांगणारा फोटो आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचा लष्करी अधिका-यांसह बैठक सुरु असलेला फोटो सोशल मिडियावर सर्वाधिक ‘ट्रेंडी’ ठरला. गूगल डूडलच्या माध्यमातूनही ‘ती’ला सलाम करण्यात आला.
एका हातात बाळ, दुस-या हाताचे बोट पकडलेला चिमुकला, घरकाम, खरेदी अशी विविध कामे एकाच वेळी सफाईने हाताळणारी ती फेसबूकवर चर्चेचा विषय ठरली. अनेकांनी महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीचे पुरुषाच्या आयुष्यातील महत्व अधोरेखित करणारे फॉरवर्डेड मेसेज किंवा स्वरचित कविता शेअर केल्या. आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणारी आई, पत्नी, मैत्रीण, मुलगी, बहीण अशा प्रत्येकीचे फोटो अनेकांच्या व्हॉटस अॅप डीपीवर झळकत होते. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांवर आधारित चित्रपटांच्या चर्चाही सोशल मिडियावर रंगल्या. स्त्री-पुरुष भेदापलीकडे जाऊन माणूसपण जपण्याचा संदेश अनेकांनी आपल्या पोस्टमधून अधोरेखित केला.
‘तू खुद की खोज मे निकल’, ‘नको काही बिरुदावली, सन्मान अन सत्कार’, ‘नाही व्हायचं मला राधा, ना मीरा’, ‘तिच्यामुळेच आम्ही आहोत, तिच्यामुळेच आम्ही असू’, ‘तुझ्या उत्तुंग भरारीपुढे नभ ठेंगणे’ अशा मेसेजनी आणि कवितांनी या दिवसाची शान वाढवली. अनेक महिलांनी यानिमित्ताने आयुष्यातील काही प्रसंग, अनुभव शेअर केले. महिला दिन साजरा करण्याची गरजच भासू नये, असा सूरही नेटिझन्सच्या चर्चांमधून ऐकायला मिळाला.
‘माझंच खरंय’ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’, ‘सेव्हन स्टेजेस इन वूमन्स लाईफ इनफंट, बेबी, मिस, यंग वूमन, यंग वूमन, अगेन यंग वूमन, आॅलवेज यंग वूमन’, ‘जीवनात योग्य रस्ता दाखवणारी एकच स्त्री म्हणजे जीपीएसवाली बाई’, ‘सर्व दिवस तुमच्याच हक्काचे’ अशा विनोदी मेसेजनीही यानिमित्ताने सोशल मिडियावर हास्य फुलवले.