पुणे : महापालिकेने सहा वर्षांपूर्वी स्थापन केलेला ''सोशल मीडिया कक्ष'' निद्रितावस्थेत आहे. सहा वर्षांपासून या कक्षाचे कामकाजच झालेले नाही. त्यामुळे या कक्षाचे कामकाज सुरू करून प्रशासकीय कामकाजाची माहिती समाज माध्यमातून लोकांसमोर आणली जाणार आहे. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहेत. त्यासाठी प्रत्येक विभागाअंतर्गत दोन कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.
पुणे शहर स्मार्ट सिटीत देशात दुसऱ्या क्रमांकाने निवडले गेल्यानंतर महापालिकेने २०१५ साली हा कक्ष सुरू केला. वर्षभर उत्तम काम केल्यानंतर हा कक्ष ढेपाळला. केवळ पालिकेचे ट्वीटर हॅंडल चालविण्या पलीकडे विशेष काम झाले नाही. या व्यतिरिक्त कोणत्याही सोशल मीडियाचा वापर केला गेला नाही. मात्र, त्याच वेळी सोशल मीडियाच्या नावाखाली सेवा ऑनलाइन करणे, मोबाइल ऍप करणे, संकेतस्थळ अद्ययावत करणे अशा कारणांसाठी दरवर्षी नियमितपणे लाखो रुपयांची उधळपट्टी मात्र सुरूच राहिली.
पालिका प्रशासनाला आता या कक्षाची आठवण झाली आहे.
हा कक्ष पुन्हा कार्यान्वित केला जाणार असून पालिकेच्या प्रत्येक विभागाची महत्त्वाची माहिती, सूचना, नागरिकांसाठी उपयुक्त माहिती, प्रकल्प, योजनांची माहिती सोशल मीडियावर अपडेट केली जाणार आहे. त्याकरिता दोन कर्मचारी नेमण्यात येणार असून हे कर्मचारी सोशल मीडिया कक्षाचे समन्वयक म्हणून काम करणार आहेत. पोस्ट केलेल्या माहितीची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवरच असणार आहे.