पुणे : स्मार्ट सिटी, वाहतूक समस्या, रक्तदान श्रेष्ठदान, ग्राम स्वच्छता अभियान यांसारख्या सामाजिक विषयावर आपल्या कल्पनाशक्तीतून नाविण्यपूर्ण चित्रे कॅनव्हासवर रेखाटत बालचित्रकारांनी सामाजिक संदेश दिला. बालचित्रकारांसोबतच उपस्थित मान्यवरांनी देखील चक्क विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्र काढत त्यामध्ये रंग भरल्याचे दृश्यं पाहून उपस्थितांना देखील प्रोत्साहन मिळाले. राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १६७ शाळांतील सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित द. मि. कै. सि. धों. आबनावे कला महाविद्यालयातर्फे सारसबागेत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिल्पकार विवेक खटावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष व सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, प्रकाश आबनावे, दिलीप आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, पी. डी. आबनावे, डॉ. छाया आबनावे, कल्याणी साळुंखे, इंद्राणी रानडे, नीता गुमास्ते, चेतन आगरवाल, आयुब पठाण, प्रशांत वेलणकर, अविनाश अडसूळ, उमेश काची, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा १३ वे वर्ष आहे.विवेक खटावकर म्हणाले, चित्रकला स्पर्धांमधून भावी चित्रकार व शिल्पकारांची पिढी घडत असते. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात कोणाची ना कोणाची सेवा करायला हवी. मग ती देवाची, आई-वडिलांची, गुरुजनांची किंवा कलेची असो. जीवनामध्ये सेवेचे महत्त्वाचे स्थान आहे. लहान वयातच मुलांमध्ये सेवा आणि कर्तव्याची भावना रुजल्यास आयुष्यात पुढे ते अनावश्यक गोष्टींचा त्याग करुन गरजूंना मदतीचा हात देऊ शकतील. याकरीता पालकांनी मुलांना तशी शिकवण द्यायला हवी.
डॉ. विकास आबनावे म्हणाले, मराठीसह इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखील चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तब्बल ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके विज्येत्यांना देण्यात येणार आहेत. सामान्य मुलांसोबत दिव्यांग मुले आणि पालकांनीही मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला असून हे यंदाचे वैशिष्ट्य आहे, असेही त्यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे होणार आहे. इंद्राणी रानडे यांनी सूत्रसंचालन केले. रुची कुलकर्णी यांनी आभार मानले.