पिंपरी : अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री, वाळू चोरी आणि जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पिंपरी - चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने दोन दिवसांत तीन छापे टाकून १३ लाख १३ हजार ३१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या तीन कारवायांमध्ये आठ आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
सामाजिक सुरक्षा पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी २२ मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या हॉटेल सर्जावर छापा टाकला. यामध्ये ७ हजार ७५० रोख रक्कम, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ७ हजार ६१७ रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या, असा एकूण २५ हजार ३६७ रूपायांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोपट राजेंद्र अटक (वय ३१, रा. पारनेर, जि. नगर) आणि इतर एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारुंजी येथे तीन पत्ती नावाच्या जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने २३ मार्च रोजी अड्ड्यावर छापा टाकला. अक्षय सीताराम बुचडे (वय २७, रा. मारुंजी) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांनी ४३ हजार २०० रुपये रोख रक्कम, ४० रुपयांचे पत्ते, असा एकूण ४३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.निगडी प्राधिकरण येथे पुण्याहून विनापरवाना एक डंपर चोरीची वाळू घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकाने निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून नितीन गोरख वेताळ (वय ३३, रा. मोहननगर, चिंचवड) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून ७१० रुपये रोख रक्कम, १२ हजार रूपायांचा मोबाईल, १२ लाख रुपयांचा डंपर, ३२ हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू असा एकूण १२ लाख ४४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.