पुणे : महाराष्ट्रातील वेगळेपण पुण्यात सापडते. ‘पुणे तेथे काय उणे’ असे त्यामुळेच म्हटले जाते. पुण्याचा विषय आला, की काही गोष्टींचा हमखास उल्लेख होतो. कारण याशिवाय या शहराची खरी ओळख पटणार नाही. यामध्ये पुणेरी पाट्या, टोमणे यांचा समावेश झाल्याशिवाय राहत नाही. एकापेक्षा एक सरस अशा पुणेरी पाट्या कोणत्याही गल्लीबोळात सहज दिसून येतात आणि त्या तेवढ्याच सहजपणे तुमचे लक्ष वेधून घेतात. पुण्यातली प्रत्येक गोष्ट जरा हटके असते. येथील पुणेरी पाट्या तर अगदी सातासमुद्रापारही प्रसिद्ध आहेत; मात्र आता यामध्ये अधिक भर टाकत आहेत पुणेरी वाक्प्रचार...
पुणे शहरात वाहतूक समस्या गंभीर रूप धारण करत आहे. यावर पुणेकर पुणेरी स्टाइलने काही बोलले नाहीत तरच नवल. याचाच प्रत्यय सोशल मीडियावर नित्याच्या वाहतूक समस्येचा समाचार घेणाऱ्या खोचक वाक्प्रचाराच्या स्वरूपात येतो आहे. सोशल मीडियावर पुण्याची वाहतूक समस्या अधोरेखित करत काही वाक्प्रचार वायरल होत असून ते मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहेत.
यामध्ये ‘आयुष्याचा नवले ब्रीज होणे’ याचा अर्थ : आयुष्यात नवनवीन संकटे सतत येत राहणे, ‘आयुष्याचा चांदणी चौक होणे’ : आयुष्यात खूप कन्फ्युजन्स असणे, ‘आयुष्याचा युनिव्हर्सिटी चौक होणे’: आयुष्यात कधीही काहीही न सुधारणे, ‘आयुष्याचा मुंढवा चौक होणे’: आशा नसताना अचानक वर्षानुवर्षे रेंगाळलेले काम मार्गी लागणे, ‘आयुष्याचा भिडे पूल होणे’: लहानसहान अडचणीतही आयुष्य पार वाहून जाणे, ‘आयुष्याची पुणे मेट्रो होणे’ : दुसऱ्यासाठी कितीही काहीही करा, कुणालाच फारशी पर्वा नसणे, ‘आयुष्याचा सिंहगड रस्ता होणे’ : कुणी कितीही मदत केली तरी आयुष्यातले बॅडपॅच संपण्याचे नाव न घेणे, ‘आयुष्याचा कात्रज चौक होणे’ : आयुष्याला काहीच अर्थ न राहणे. अशा प्रकारचा आशय सोशल मीडियावर वायरल होत आहे.