पुणे: पुण्यातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था, तरुणांकडून मदतीचा ओघ सुरु आहे. जीवाची पर्वा न करता ही लोक गोरगरिबांचा आधार बनले आहेत. गरजूंची भूक भागवण्यासाठी सातत्याने अन्नदानाची मोहीम राबवत आहेत. अशाच प्रकारे सामाजिक क्षेत्रात काम करताना संतोष कांबळे यांना कधी कोरोनाची लागण झाली हे कळालेच नाही. समाजकार्य करताना ही व्यक्ती कुटुंबासहीतच कोरोनाच्या विळख्यात अडकली. पण संपूर्ण कुटुंबीयांनी न घाबरता एकमेकांना धीर देत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
पत्नी मनीषा, मुलगी ऋतुजा व मुलगा ओमराजे आणि संतोष कांबळे असे चार सदस्यांचे कुटुंब आहे. कांबळे यांनी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना बऱ्याच कुटुंबांना कोरोना काळातही मदत केली. परंतु दुर्दैवाने त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ पत्नी आणि दोन मुलं अशा सर्व कुटुंबाला कोरोनाने घेरले.
डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्वांनी गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना दररोज जास्तीत जास्त चांगला आहार दिला. त्यांनी स्वतःबरोबर कुटुंबीयांनाही त्याच पद्धतीने आहार आणि औषधे दिली. लवकरच कोरोनातून बरे व्हाल असा विश्वास डॉक्टरांनी दिला होता. संकटसमयी एकमेकाला धीर देऊन आधार देण्याची अत्यंत गरज आहे. उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत बरे वाटू लागले. असे कांबळे यांनी सांगितले. त्यांचा समाजकार्यात सक्रिय सहभाग असल्याने यामध्ये त्यांना काही पोलिस अधिकारी, सहकारी मित्र यांचे सहकार्य लाभले.
एकमेकांना धीर देत, घाबरून न जाता खंबीरपणे सामना केला, तर कोणतेही संकट परतवून लावता येते. कोरोना महामारीच्या आजारातून स्वतःबरोबर कुटुंबाला सावरले. कोरोना महामारीने जगाला विळखा घातला आहे. आरोग्याची कसलीही तक्रार वाटू लागली, तर लगेच डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. घाबरून जाऊ नका, सकारात्मक राहा, रक्ताच्या नात्यासह मित्र परिवाराला आधार द्या, आता ती गरज आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री पाळा इतरांनाही पाळण्यासंबंधी प्रबोधन करा, ही तुमच्या-आमच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. स्वतःबरोबर इतरांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे पालन करा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.