कदमवाकवस्ती (पुणे): लोणी स्टेशन (ता. हवेली) येथील पालखीस्थळावर गेली सात आठ दिवसांपासून मरण यातना सहन करत पडलेल्या व्यक्तीला समाज सेवकांकडून जीवनदान देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोणी स्टेशन येथील पालखी स्थळावर एक मनुष्य गेली साथ आठ दिवस बेशुद्ध अवस्थेत पडून होता. याची माहिती येथील समाजसेवक राम भंडारी, अमन शेख व अमोल खोले यांना मिळाली. त्यांनी त्वरित या घटनेची महिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनला देऊन शासकीय ऍम्ब्युलन्सला संपर्क करून त्या माणसाला पुण्यातील ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवून दिले.
या कामासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ईश्वर भगत, घनश्याम कुमार आडके, सामाजिक कार्यकर्ते अमन शेख, अमोल खोले, राम भंडारी, १०८ रुग्णवाहिका चालक शानु शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते राम भंडारी म्हणाले की, आपल्या परिसरात कोठेही अशा प्रकारे कोणी मनुष्य धोकादायक परिस्थितीत पडून असेल तर याची माहिती त्वरित पोलीस स्टेशनला देऊन मदत करावी जेणेकरून अश्या माणसांना जीवनदान मिळू शकेल.