राहुल कलाल, पुणेशहरात गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायट्या उभ्या राहिल्या. पण यातील बहुतांशी सोसायट्यांना आजही त्यांच्या जागेचे मालकी हक्क मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरात असलेल्या १८ हजार सोसायट्यांपैकी तब्बल १७,५०० सोसायट्यांना त्यांच्या जागेचा मालकी हक्कच मिळालेला नाही. कारण त्यांनी मानीव अभिहस्तांतरणच (डिम्ड कन्व्हेन्स) केले नसल्याचे समोर आले आहे.पुणे शहरात तब्बल १८ हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या नोंदी जिल्हा उपनिबंधकांकडे आहेत. सोसायट्या उभारताना अनेकदा जमिनीचा मालक एक, बांधकाम करणारे व्यावसायिक दुसरे अशी स्थिती असते. इमारती बांधून त्याची विक्री ग्राहकांना केल्यानंतर, ग्राहक सोसायटी स्थापन करतात. या सोसायटीची सर्व जागा त्यांच्या नावे करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक, जमीनमालकाने डिम्ड कन्व्हेन्स ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र अनेकदा ते होत नसल्याने सोसायट्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज करून हे डिम्ड कन्व्हेन्स करू शकतात. शहरातील बहुतांशी सोसायट्यांमध्ये हे डिम्ड कन्व्हेन्स केले नसल्याचे चित्र आहे.डिम्ड कन्व्हेन्स केल्यामुळे गृहनिर्माण सोसायटीची, अॅमेनिटीजची जागा ही सोसायटीच्या नावे होते आणि त्यावरील जमीनमालक व बांधकाम व्यावसायिकाचा मालकी हक्क सोसायटीकडे हस्तांतरित होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने सोसायटीच त्या जागेचा मालक होते. पण ही नोंदणीच केली जात नसल्याने सोसायट्यांना मालकी हक्कापासून वंचित राहावे लागत आहे.याबाबत पुणे शहराचे जिल्हा उपनिबंधक धरणीधर पाटील ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, शहरात सोसायट्यांची संख्या मोठी आहे. पण डिम्ड कन्व्हेन्स करण्यासाठी मात्र त्यांच्यामध्ये जागृतीचा अभाव आहे. आमच्याकडे नोंदणी असलेल्या १८ हजार गृहनिर्माण संस्था आहेत. त्यापैकी केवळ ६०० सोसायट्यांनीच डिम्ड कन्व्हेन्ससाठी आमच्याकडे अर्ज केला आहे. त्यापैकी ४५० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जांमध्ये त्रुटी असल्याने त्याची सुनावणी सुरू आहे. काय आहे डिम्ड कन्व्हेन्स?डिम्ड कन्व्हेन्सला मराठीत मानीव अभिहस्तांतरण म्हणतात. जेव्हा जागामालक, बांधकाम व्यावसायिक इमारतींची बांधणी करतात आणि त्या ग्राहकांना विकतात. त्यानंतर त्या गृहनिर्माण इमारतीची जागा आणि त्याच्याशी संबंधित सर्व बाबींचा मालकी हक्क त्या गृहनिर्माण सोसायटीला देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठी डिम्ड कन्व्हेन्स ही कायदेशीर प्रक्रिया केली जाते. त्यात जमीनमालक, बांधकाम व्यावसायिक त्यांच्या नावावर असलेली इमारतीची, अॅमेनिटीजची जागा व इतर गोष्टी सोसायटीच्या नावे करते. यालाच डिम्ड कन्व्हेन्स म्हणतात.डिम्ड कन्व्हेन्स करण्याची प्रक्रिया सोपीडिम्ड कन्व्हेन्स करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सोपी प्रक्रिया ठेवली आहे. यामध्ये अर्ज हा आॅनलाईन दाखल करायचा असतो. त्यानंतर त्याच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे कार्यालयात दाखल करायची असतात. त्यानंतर त्याची शहानिशा होऊन कार्यालयाकडून प्रकरण मंजूर केले जाते आणि सोसायटीला मालकी हक्क प्राप्त होतो, अशी माहिती धरणीधर पाटील यांनी दिली.फायदे काय?डिम्ड कन्व्हेन्स केल्यामुळे गृहनिर्माण सोसायटीची जागा त्या सोसायटीच्या नावे होते. त्यामुळे त्या जागेचा, अॅमेनिटीजच्या जागेचा, बांधकामाचा मालकी हक्क सोसायटीला मिळतो. त्यामुळे जर या इमारतींसाठी एफएसआय शिल्लक असेल तर तो सोसायटी वापरू शकते. सोसायटीला टीडीआर घेता येते. देखभाल-दुरुस्तीसाठी सोसायटीला कर्ज काढता येते. थोडक्यात मालकी हक्काचे सर्व फायदे सोसायटीला मिळतात.
मालकी हक्कापासून सोसायट्या वंचित
By admin | Published: April 09, 2016 1:59 AM