लोकमत न्यूज नेटवर्क
पुुणे : प्रबोधनकार ठाकरे हे प्रखर वक्ते, प्रभावी पत्रकार, लेखक आणि समाजसुधारक होते. महात्मा फुले यांनी अनिष्ट प्रथांविरुद्ध सुरू केलेला लढा त्यांच्यानंतर प्रबोधनकारांनी सुरू ठेवला. संगणक युगात अंधश्रद्धेविरुद्ध लढा देणाऱ्या व्यक्तीच्या जिवाला धोका होऊ शकतो तर त्या काळी समाजातील कुप्रथांविरोधात लढा उभारण्यासाठी त्यांना केवढा मोठा धोका पत्कारावा लागला असेल? प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी केलेल्या समाजसुधारणेच्या कामाचे खरोखरच कौतुक आहे. अशा विचारांची समाजाला आजही गरज आहे. त्यांचे विचार आजच्या पिढीला कळले पाहिजे, असेल? प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी केले.
ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन पाक्षिकाच्या शतकोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण प्रतिभा पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. १०) झाले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी देवीसिंह शेखावत, संवाद पुणेचे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, ज्येष्ठ पत्रकार हरिष केंची, उद्योजक विशाल चोरडिया, सचिन इटकर, डॉ. शैलेश गुजर, किरण साळी उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आमचे हिंदुत्व प्रबोधनकारी हिंदुत्व आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पाया हा प्रबोधनकारांच्या शिकवणीतून निर्माण झाला आहे. काही राज्यांमध्ये आजही अनिष्ट प्रथा दिसून येतात, महिलांवर अत्याचार होतात, त्यामुळे हिंदी भाषिक राज्यांमध्येही प्रबोधनकारांच्या विचारांची परंपरा पाेहोचली पाहिजे.
सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी प्रबोधन पाक्षिकाच्या शताब्दीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन केले जावे, अशी मागणी महाजन यांनी केली.
बोधचिन्ह मृणाल केंची यांनी साकारले आहे. डॉ. शैलेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिन इटकर यांनी आभार मानले.
फोटो ओळ : प्रबोधन शतकोत्सवाच्या बोधचिन्ह अनावरणप्रसंगी उपस्थित
(डावीकडून) सचिन इटकर, विशाल चोरडिया, डॉ. शैलेश गुजर, देविसिंह शेखावत,
प्रतिभाताई पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, सुनील महाजन, किरण साळी, निकिता
मोघे.
(फोटो - प्रबोधन पाक्षिक या नावाने हॅलोसिटीत आहे.)