पुणे : अनेक समाजसुधारकांना समाजातील रुढी-परंपरा बदलताना अडचणी आल्या. कारण ते अल्पमतात तर असहिष्णु लोकांचे बहुमत होते. विरोधकांनी मांडलेल्या मुद्याला आपण किती संयमाने आणि कोणती भाषा वापरून उत्तर देतो, यावर तुमच्यातील विचारस्वातंत्र्याची भावना ठरते. त्यामुळे विचारस्वातंत्र्य आणि उदारमतवादाचा समाजानेच स्वीकार केला तरच तो खरे स्वातंत्र उपभोगु शकेल, असे मत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी येथे व्यक्त केले.डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्र व राजहंस प्रकाशनच्या वतीने रविवारी चपळगावकर यांना पहिला श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे व राजहंस प्रकाशनचे संपादक सदानंद बोरसे व्यासपीठावर उपस्थित होते. चपळगावकर यांनी ‘स्वातंत्र्य : लेखकांचे आणि वाचकांचे’ या विषयावर विचार व्यक्त केले. ते म्हणाले, जागतिक पातळीवरच असहिष्णुतेचे वातावरण असल्याने आज विचारस्वातंत्र्याचे महत्व सांगावे लागत आहे. माणसाचे अस्तिवच विचार करण्याच्या शक्तीवर आहे. एक हजार वर्षाचा काळ उदारमतवादाचा व विचारस्वातंत्र्याचा आहे. हेकेखोरपणा हा सत्तेचा दुर्गण आहे. त्यामुळे सल्ला देणारे विचारवंत समाजात असावे लागतात. ज्ञानाचे शत्रु असणारे जेव्हा सत्तेवर येतात तेव्हा काय होते, हे आपण अनेकदा पाहिले आहे. हिंसेने किंवा कायद्याचा गैरवापर करून अधिकार काढू घेतले जातात. असे प्रकार पढे होणार नाही, याची खात्री देता येत नाही.लोकांच्या झुंडशाहीचा विरोध लेखकांना एकट्याला करावा लागतो. साहित्य संस्था त्यांच्या पाठिशी उभ्या राहत नाहीत. त्यामुळे अनेकदा लेखकाच्या मनात विचारांचे द्वंद्व निर्माण होते. त्यावर मात करून जो लेखक लिहितो तो निर्माणशील दृष्टीचे स्वातंत्र टिकवितो. वाड्मय कधीही एका जातीचे, पंथाचे, पक्षाचे नसते. जेवढी बंधने सत्ता घालते त्यापेक्षा जास्त बंधने लेखक स्वत:वर घालतात. लेखकाची सतत भलावण करणारे मित्र हे त्याचे शत्रु असतात. त्यामुळे लेखांनी स्तुतीपासून दुर राहायला हवे. लेखक हा त्या काळाचा साक्षीदार असतो. त्यामुळे त्याने नेहमी खरे लिखाण करायला हवे. वाचकांचा व लेखकांचा अधिकार समांतर असायला हवा. त्यामुळे वाचकांचे स्वातंत्र्यही टिकवायला हवे. वाचनातून निर्माण होणारे विचारस्वातंत्र्य तरूण पिढी विसरत चालली आहे, असे चपळगावकर यांनी नमुद केले. ......दीर्घ वैचारिक वाड्मयाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात विचारवंतांची वानवा आहे. समाज अनुदार बनतोय. सर्व भ्रष्ट होत चालले आहे. सांस्कृतिक मुल्याच्यादृष्टीने गढूळ, निम्नस्तरीय वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या राजकीय व सामाजिक स्थितीचा विचार केला तर आज विचारवंतांची खुप गरज आहे. संकुचितपणा थोपवायचा असेल तर लोकांपर्यंत समाजातील आदर्श पोहचवायला हवेत.- डॉ. सुधीर रसाळ
समाजाने उदारमतवाद, विचारस्वातंत्र्य स्वीकारावे : नरेंद्र चपळगावकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:51 AM
जागतिक पातळीवरच असहिष्णुतेचे वातावरण असल्याने आज विचारस्वातंत्र्याचे महत्व सांगावे लागत आहे.
ठळक मुद्देपहिला श्री. ग. माजगावकर स्मृतिसन्मान प्रदान समारंभ माणसाचे अस्तिवच विचार करण्याच्या शक्तीवर एक हजार वर्षाचा काळ उदारमतवादाचा व विचारस्वातंत्र्याचा