भारतीय महिला आरोग्य अहवाल : खाजगी संस्थेतर्फे ७ शहरांतील १००० स्त्रियांचे सर्वेक्षण
पुणे : मासिक पाळीसह कर्करोग, वंध्यत्व, पीसीओएस यासारख्या स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल समाजात आजही खुलेपणाने बोलले जात नाही. नोकरदार महिलांमध्येही याबाबत कमालीचा संकोच पाहायला मिळतो. स्तन, अंडाशय, गर्भाशयाचा कर्करोग याबद्दल समाजात बोलणे आजही निषिद्ध मानले जाते, असे ६७% नोकरदार महिलांना वाटते, असा निष्कर्ष खाजगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आला आहे.
पुणे, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या ७ शहरांमधील २२ ते ५५ वर्षे वयोगटांतील १००० नोकरदार स्त्रियांचे सर्वेक्षण करण्यात आले. ‘एम्क्युअर’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून भारतीय महिला आरोग्य अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. यामध्ये मासिक पाळीबाबत समाजात असलेला टॅबू, स्त्रीविषयक आजारांबाबत असलेला संकोच यामुळे महिलांच्या व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होत असल्याचे मत सर्वेक्षणातून नोंदवण्यात आले आहे.
कौटुंबिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधत असताना ९० % नोकरदार स्त्रियांना आजही संघर्षाचा सामना करावा लागतो. कार्यरत महिलांपैकी ८६% स्त्रियांनी त्यांच्या सहकारी/नातेवाईक/मैत्रिणी यांना नाईलाजाने नोकरी सोडावी लागली, असे निरीक्षण नोंदवले आहे. त्यापैकी ५९% महिलांची काम सोडण्याची मुख्य कारणे पीसीओएस, गर्भारपण आणि एंडोमेट्रियॉसिस या आरोग्यविषयक समस्या आहेत. ८४% नोकरदार स्त्रियांना मासिक पाळीसंदर्भात आजही संकुचित दृष्टिकोनाचा सामना करावा लागतो.
-------------------------
काय आहेत निरीक्षणे?
- ५२% नोकरदार स्त्रियांना काम करताना आरोग्य सांभाळणे जिकिरीचे वाटते. यात रिटेल क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ६७% आहे.
- चारपैकी तीन नोकरदार स्त्रियांना कामापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याबाबत अधिक दबाव टाकला जातो.
- एंडोमेट्रियॉसिसच्या दुखण्याने ग्रस्त असणाऱ्या स्त्रिया विवाहासाठी योग्य नाही, असे समाजाला वाटते, असे ६६% महिलांनी सांगितले.
----------------------
कॉपोर्रेट क्षेत्रात आपण इतकी प्रगती केलेली असली आणि महिला या क्षेत्रात अग्रेसर असल्या, तरी त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे आजही संकुचित वृत्तीने पाहिले जाते. महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत प्रचंड प्रमाणात गैरसमजुती समाजात मूळ धरून आहेत. दुर्लक्ष, जाणिवेचा अभाव आणि स्वीकार करण्याचा अभाव यामुळे प्रश्नाचे योग्य निदान होणे आणि मग तो सोडवणे अधिक कठीण होऊन बसते. एक जबाबदार समाज म्हणून या प्रश्नांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्त्रियांच्या पुरुष सहकाऱ्यांनीही संवेदनशीलता दाखवणे आवश्यक आहे.
- नमिता थापर