उजनी धरणाच्या तक्रारवाडी, कुंभारगाव, राजेगाव, खाणावटे पाणलोट क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून दिवसरात्र मातीउपसा केला जात आहे. याबाबत कोणी चौकशी करायला गेले तर माती शेतात भरण्यासाठी जलसंपदा विभागाने परवानगी दिली असल्याचे आणि त्याची रीतसर रॉयल्टी भरली असल्याचे सांगितले जाते. मात्र खरंतर ही माती राज्यातील वीट व्यावसायिकांना पोहोच केली जात असल्याचे वास्तव आहे. तर १०० ब्रासची परवानगी काढून हजारो ब्रास माती उचलली जात असताना संबंधित विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येते. याच्यामागे यातील अधिकाऱ्यांना शासकीय खनिज चोरीबाबत जागरूकता अगर शेतकऱ्यांचा कळवळा नसून आर्थिक तडजोडी हे कारण असल्याचे बोलले जात आहे. अनेकांनी वरिष्ठ पातळीवर तक्रारी करूनही हा विभाग हजारो ब्रास माती ओरबाडून नेल्यानंतर आणि पावसाने मातीउपसा बंद झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जात चोरीची तक्रार करत असेल आणि तीही अज्ञात चोराविरोधात, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
उजनी धरणातील पाणी खाली गेल्या कुंभारगाव,तक्रारवाडी ,राजेगाव,डिकसळ ,खानावटे गाळ पेर क्षेत्रातून माती उपसा करून ती वीट व्यावसायिकांना विकली जाते. याच्यामागे लाखो रुपयाचे अर्थकारण असल्याचे वास्तव आहे .त्याच्यासाठी माती माफिया आपल्या ओळखीच्या अधिकाऱ्यांशी संधान साधत तुटपुंजी ब्रास मातीची परवानगी मिळवीत उजनी ओरबाडून काढली जाते.
उजनीतील माती उचलण्यावरून अनेक वेळा तरुणांच्या टोळक्याची भांडण होऊन माती रक्तरंजित झालेली असली तरी प्रशासन याकडे गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
याबाबत जलसंपदा विभागाचे भिगवण विभागाचे अधिकारी संजय मेटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कार्यक्षेत्रातील अधिकारी नुकतेच सेवानिवृत्त झाल्यामुळे पदभार आपण स्वीकारला असल्याचे सांगितले. तर कारवाई करण्यास उशीर झाल्याचे मान्य करीत आपल्या विभागाने पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून तपास करणे पोलीस विभागाचे काम असल्याचे सांगितले.