पुणे: वाढत्या वीज बिलामुळे होणारा खर्च कमी करण्यासाठी पुणेरेल्वे विभागाने महत्त्वाच्या ठिकाणी सौर पॅनल बसविण्यात आले. यामुळे वीज बिलात बचत होत आहे. यंदा पुणे रेल्वे विभागात १.८ मेगावॅट सौरऊर्जा निर्माण केली असून, त्यामध्ये सर्वाधिक घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स येथे ६४७ किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प बसविला आहे. त्यामधून वर्षाला जवळपास ५५ लाख रुपयांची वीज बिलापोटी बचत होत आहे.
मोदी सरकारने २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून जास्तीत जास्त सौरऊर्जा निर्मिती करून शून्य कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल सुरू केली आहे. पुणे रेल्वे विभागाची २.७ मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीची क्षमता झाली आहे. या एकूण प्रकल्पामधून कोट्यवधी रुपयांची वीजबचत होणार आहे. आतापर्यंत पुणे रेल्वे विभागाने त्यांच्या पुणे स्टेशनसह काही रेल्वे स्टेशनवर सौर पॅनल बसवून सौरऊर्जा निर्मिती केली जात आहे.
या आर्थिक वर्षात सौरऊर्जा निर्मिती वाढविण्याच्या दृष्टीने घोरपडी डिझेल शेड, दौंड आरओएच शेड, कोल्हापूर रेल्वे स्टेशन, मिरज रेल्वे स्टेशन, सातारा रेल्वे स्टेशन अशा प्रमुख १० ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प सुरू केले आहेत. यासाठी वरिष्ठ विद्युत अभियंता यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प वाढविण्यावर भर दिला. पुणे रेल्वे विभागात आता रेल्वे स्थानक आणि इतर डेपो अशा ४२ ठिकाणी सौरऊर्जा निर्मिती सुरू झाली आहे. पुणे रेल्वे विभागात २.७ मेगावॅट ऊर्जा निर्मिती सौरपॅनलच्या माध्यमातून सुरू झाली आहे. ही वीज रेल्वे स्थानक, तेथील डेपोंसाठी वापरली जात आहे. या उपक्रमामुळे हरितगृह वायू उत्सर्जन कमी होते आणि ऑपरेटिंग खर्च कमी होतो, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.