पुणे : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) नगररचना अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून कोथरूड व शुक्रवार पेठेतील प्रभागांचा लोकल एरिया प्लॅन (स्थानिक प्रभाग आराखडा) तयार केला जात आहे. प्रभागातील रस्ते, वाहतूक व दळणवळण, पादचारी सुविधा, पाणीपुरवठा व सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, बांधकाम नियमावली आदींचा सूक्ष्म अभ्यास करून हा आराखडा तयार केला जाणार आहे. प्रभागांमध्ये सुविधांची स्थिती कशी आहे, त्यामध्ये आणखी काय सुधारणा करता येऊ शकतील याची माहिती या आराखड्यातून मिळू शकणार आहे. सीओईपीतील नगरचना (बी. टेक. प्लॅनिंग) अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक उपक्रमांतर्गत हा लोकल एरिया प्लॅन तयार केला जात आहे. त्यांनी कोथरूड व शुक्रवार पेठेमधील प्रभाग क्रमांक ३५ व प्रभाग क्रमांक ५८ची यासाठी निवड केली आहे. येत्या ५ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या सर्व्हेचे काम चालणार आहे. त्यानंतर त्याचे विश्लेषण करून विद्यार्थ्यांकडून आराखडा तयार केला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रा. रामचंद्र गोहाड, प्रा. योगेश केसकर, प्रा. पौलोमी घोष, प्रा. प्रताप रावळ यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
विद्यार्थी सुचविणार उपाय
By admin | Published: August 29, 2016 3:40 AM