पुणे : महापालिका आयुक्त शहरासाठी अनावश्यक असलेल्या समान पाणी योजना व अन्य अनेक प्रकल्पांमध्ये वेळ घालवत आहे. त्यांना लगाम घाला व आता तुम्हीच शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिस्ट रूट-शहरातून जाणारा वर्तूळाकार मार्ग) रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी त्यात लक्ष घाला असे आवाहन करणारे पत्र ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.सन १९८७ मधील शहराच्या विकास आराखड्यात हा रस्ता होता. तेव्हा त्याची किंमत ५०० कोटी होती, ती आता सहा हजार कोटी झाली आहे. प्रशासन करत असलेल्या दुर्लक्षामुळेच हे होत आहे. फक्त अवजड वाहतुकीसाठी शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामासाठी गेली सलग १२ वर्षे प्रयत्न करत आहे. त्याचे आरेखन झाले आहे, त्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त केली आहे. त्यांनी संपुर्ण आराखडा दिला आहे, मात्र भूसंपादनाच्या विषयावर प्रशासन हे काम रखडवत आहे असे बागूल यांचे म्हणणे आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी हे सर्व नमूद केले असून गरज नसताना आयुक्तांनी २४ तास पाणी योजना आणली. त्यासाठी महापालिका कर्जबाजारी केली. अशा अनेक प्रकल्पांचा ते पाठपुरावा करीत आहेत, व शहराची खरी समस्या असलेली वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मात्र काहीही करायला तयार नाहीत. वारंवार भेट घेतली, आंदोलन म्हणून त्यांचे सरकारी वाहन साखळीने बांधून पाहिले, मात्र फक्त आश्वासनांशिवाय ते काहीही करत नाहीत, प्रशासन प्रमुख म्हणून त्यांनी या रस्त्याच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करणे आवश्यक होते, पण तेही झालेले नाही अशी तक्रार बागूल यांनी केली आहे. त्यांना लगाम घाला, व वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आता तुम्हीच लक्ष घाला असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे शहरातील वाहतूककोंडी सोडवा; आबा बागुल यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 1:51 PM
शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एचसीएमटीआर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी त्यात लक्ष घाला असे आवाहन करणारे पत्र ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
ठळक मुद्देफक्त अवजड वाहतुकीसाठी शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या रस्त्याच्या कामासाठी गेली १२ वर्षे प्रयत्नफक्त आश्वासनांशिवाय ते काहीही करत नाहीत : आबा बागूल