येरवडा : नेताजी हायस्कूल रेकॉर्ड रूम लागलेल्या आग प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. शाळेची सध्याची अवस्था बघता महापालिका शिक्षण विभागाचे शाळेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून सुरक्षेसह इतर अनेक गंभीर समस्यांकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. तसेच नेताजी शाळेतील समस्या कायमस्वरूपी सोडवल्या न गेल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी शिक्षण प्रमुखांना देण्यात आला आहे.
येरवडा येथील नेताजी हायस्कुलच्या रेकॉर्ड रूमला बुधवारी सकाळी आग लागली होती. या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली. शाळेसाठी आवश्यक निधी योग्य त्या कारणासाठी न वापरता त्याचा वापर अनावश्यक खर्चासाठी केला जात आहे. स्वच्छता, डागडुजी, सुरक्षा यंत्रणा तसेच इतर अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असताना देखील स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करतात. शाळा प्रशासनाकडून वेळोवेळी क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाला लेखी निवेदन करून देखील यावर कुठल्याच प्रकारची उपाययोजना केली जात नाही. याचा जाब विचारण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी नगर सचिव तसेच माध्यमिक विभागाचे शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांची भेट घेतली. आगीची घटना घडल्यानंतर माध्यमिक विभागाचे कोणतेही अधिकारी संध्याकाळपर्यंत शाळेत फिरकले नव्हते. शाळेतील विविध समस्यांसह आगीच्या गंभीर घटनेचे देखील गांभीर्य माध्यमिक विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही. खाते प्रमुखांनी सूचना देऊन देखील संध्याकाळपर्यंत अधिकारी शाळेत पोहोचले नव्हते. याचा थेट जाब मनसे सैनिकांनी शिक्षण प्रमुखांना विचारला. आगीच्या घटनेची चौकशी करून दोन दिवसांत शाळेला स्वतः भेट देऊन सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन शिक्षण प्रमुख दौंडकर यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडगाव शेरी विभाग अध्यक्ष सुनिल कदम, मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य रुपेश घोलप यांच्यासह पक्षाचे लक्ष्मण काते, मनोज ठोकळ, वंदना साळवी, कुलदीप घोडके, दत्ता माळी, जेमा चव्हाण, संतोष काते उपस्थित होते.