रहाटणी : पुणे शहरातील अनेक रस्ते संरक्षण विभागाच्या हद्दीतून जात असल्याने सुरक्षाकारणाने अनेक रस्ते बंद करण्यात आले. मात्र, पिंपळे सौदागरचा रस्ता येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत सोडविला जाईल, असे केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पिंपळे सौदागर येथे एका कार्यक्रमात नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले. पिंपळे सौदागर येथील कुंजीर डेअरी ते रक्षक सोसायटी चौक हा रस्ता संरक्षण विभागाने मागील काही महिन्यांपासून कायमस्वरूपी बंद केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या सुमारे दीड लाख नागरिकांची परवड होत आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी संरक्षणमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला होता. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना येथील प्रश्न भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी संरक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पर्रीकरांनी या भागातील नागरिकांची भेट घेतली. या वेळी खासदार अमर साबळे, नगरसेवक शत्रुघ्न काटे आदी उपस्थित होते. या वेळी आमदार जगताप यांनी या भागातील नागरिकांचा प्रश्न मांडला. पिंपळे सौदागर येथील अनेक सोसायट्यांमधील नागरिक पुण्याला ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा वापर करत होते मात्र रस्ता बंद झाल्याने सुमारे तीन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे, असे सांगितले. तसेच नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनीही या प्रश्नाबाबत माहिती दिली. त्यानंतर मनोहर पर्रीकरांनी येथील नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘हा रस्त्याचा प्रलंबित प्रश्न येत्या २८ तारखेपर्यंत सोडविणार आहे.’’ सरंक्षण मंत्री थेट भेटीला आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)
रस्त्याचा प्रश्न सोडवू : मनोहर पर्रिकर
By admin | Published: February 18, 2017 3:07 AM