पुणे : फुरसुंगी व उरळी देवाची येथील लोकप्रतिनिधींची महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन, तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा़, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज सर्वसाधारण सभेत दिले.
फुरसुंगी व उरळी देवाची येथे केवळ ठेकेदारांना पोसण्यासाठी टँकरवर दरवर्षी आठ कोटी रुपये खर्च केले जात आहेत़ याचा निषेध करीत स्थानिक नगरसेवक गणेश ढोरे यांनी आज सर्वसाधारण सभेत कावड घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला़ या वेळी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, योगेश ससाणे, वैषाली बनकर व इतर सदस्यांनीही समाविष्ट गावांमधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रथम ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी लावून धरून घोषणाबाजी सुरू केली़ तेव्हा महापौर मोहोळ यांनी सर्वसाधारण सभा संपल्यावर आयुक्तांनी लागलीच येथील लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे आदेश दिले.
याबाबत ढोरे म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेमार्फत फुरसुंगी, उरुळी देवाची ग्रामीण भागासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. परंतु, सध्या या योजनेचे काम निधीअभावी बंद असून, ही दोन गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे शहराचा भाग बनले आहेत. आजमितीला ७ ते ८ कोटी रुपये येथे दरवर्षी टँकरवर खर्च केले जातात़ तरीही येथील अडीच लाख नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे़ त्यामुळे टँकरवर खर्च करण्यापेक्षा पाणीपुरवठा योजनेवर खर्च केल्यास येथील नागरिकांचा पाणीप्रश्न मिटेल, अशी मागणी त्यांनी यावेळी लावून धरली.
--------------------------
फोटो मेल केला आहे.