पिंपरी : ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १३ लाख २७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. ही घटना २१ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत चिंचवड येथे घडली. याप्रकरणी ३४ वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १७) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची प्राथमिक माहिती गोळा करून त्यांना संशयिताने फोन करीत नोकरीचे आमिष दाखविले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून सुरुवातीला त्यांचे एक पार्सल कस्टममध्ये अडकल्याचेही सांगितले. नोकरी आणि कस्टममधील पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून महिलेकडून १३ लाख २७ हजार वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेतले. महिलेला फोन करणाऱ्या व्यक्तीने तो कार्निवल ब्रिझ शिपिंग कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.