जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीमध्ये येत्या सोमवारी (दि. २१) खंडेरायाचा सोमवती उत्सव सोहळा होणार असून त्याच दिवशी सूर्यग्रहण असल्याने देवदर्शन, कुलधर्म-कुलाचार व क-हास्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.दुपारी १ वाजता क-हास्नानासाठी गडकोटातून खंडेरायाच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. सूर्यास्तापूर्वी उत्सवमूर्तींना विधिवत स्नान व अभिषेक करण्यात येणार असल्याची माहिती प्रमुख मानकरी इनामदार राजेंद्र पेशवे यांनी दिली. गुरुवारी (दि. १७) पेशवे यांच्या निवासस्थानी खांदेकरी-मानकरी पालखी सोहळा मंडळाची बैठक पार पडली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, खंडेराव काकडे, विश्वस्त सुधीर गोडसे आदींसह विविध मानकरी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी मार्गाची स्वच्छता करण्यात येणार आहे, तसेच सध्या दुष्काळसदृश स्थिती असल्याने पाणलोटक्षेत्र कोरडे पडले आहे. त्यामुळे उत्सवमूर्तींसह आलेल्या भाविकांना कºहानदीतीरी असलेल्या पापनाशतीर्थावर टँकरची सुविधा निर्माण करावी, सूर्यास्त झाल्यानंतर पालखी सोहळा नगरामध्ये प्रवेश करणार असल्याने पालखी सोहळ््यापुढे दिवाबत्ती असावी, भाविकांना पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याची सोय करावी आदी मागण्या या वेळी मानकरीबांधवांनी केल्या.
जेजुरीत सोमवती यात्रेची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:47 AM