पुणे : क्रिकेटपटू, व्यवस्थापक, निवडसमिती, प्रशिक्षक अशा विविध भूमिका ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांनी बजावल्या आहेत. तब्बल साठ वर्षे सेवा करुन त्यांनी क्रिकेटला भरभरुन दिले आहे. अशा पद्धतीने क्रिकेटचे ऋण फेडण्यासाठी माझ्या सारख्याला काही जन्म लागतील अशी कृतज्ञ भावना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. अनुबंध प्रकाशनाच्या ‘चंदू बोर्डे पँथर पेस’ या आत्मचरित्राचे प्रकाशन गावस्कर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. बोर्डे यांनी कॅम्प येथील पूना क्लबच्या मैदानावरुन वयाच्या सोळाव्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्याच मैदानावर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. निवृत्त कर्नल ललित राय, पूना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले-पाटील, अनुबंध प्रकाशनाचे अनिल कुलकर्णी, पुस्तकाचे अनुवादक मोहन सिन्हा यावेळी उपस्थित होते. गावस्कर म्हणाले, अगदी १९५८ पासून मी चंदू बोर्डे यांचा खेळ पाहत आहे. त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीची एक शैली होती. ती जवळून पाहता आली. त्यांच्यासह त्या काळातील दिग्गजांकडूनच आम्ही भरपूर शिकलो. त्यांच्या वारशावर आमची पिढीही शिकत गेली. बोर्डे यांनी क्रिकेटची सेवा करत खेळालाही भरभरुन परत दिले. त्यांनी क्रिकेटसाठी साठ वर्षे वेचली आहेत. माझ्या सारख्याला एका आयुष्यात खेळाला परत काही देणे शक्य होणार नाही. त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील. माझ्या क्रिकेटची सुरुवात याच मैदानावर झाली. आत्मचरित्र प्रकाशनाचा कार्यक्रम देखील याच मैदानावर होत असल्याने कृतज्ञतेची भावना बोर्डे यांनी व्यक्त केली. त्या वेळचे पूना क्लबचे अध्यक्ष नगरवाला यांनी खेळण्याची प्रेरणा दिल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. आमच्या काळी प्रशिक्षक हा प्रकार फारसा प्रचलित नव्हता. त्यामुळे आम्ही दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहूनच शिकल्याचेही त्यांनी सांगितले. क्रिकेटचे स्तंभ लेखक सुनंदन लेले यांनी सूत्रसंचालन केले.
बोर्डेंसारखे क्रिकेटचे ऋण फेडण्यास काही जन्म लागतील : गावस्करांची कृतज्ञ भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 9:11 PM
माझ्या सारख्याला एका आयुष्यात खेळाला परत काही देणे शक्य होणार नाही. त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील.
ठळक मुद्दे चंदू बोर्डे यांच्या ‘चंदू बोर्डे पँथर पेस’ या आत्मचरित्राचे प्रकाशन तब्बल साठ वर्षे सेवा करुन बोर्डे यांनी क्रिकेटला दिले भरभरुन