पुणे : गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात समृद्ध जीव फुडस आणि समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्ट पर्पज कपंनीवर देशभरात अनेक गुन्हे दाखल असून त्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) करीत आहेत. सीआयडीच्या तपास पथकाला नर्हे आंबेगाव येथील २ फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे सापडली असून त्यातून कंपनीची आणखी काही मालमत्ता समोर आली आहे. गुरुवारी सकाळपासून सीआयडीचे १२ जणांचे पथक ही कागदपत्रे छाननी करण्याचे काम करीत असून ते उद्याही सुरु राहणार आहे.
सीआयडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध जीवनचा तपास करण्यात येत आहे. या गुन्ह्यात एकूण २५ आरोपी असून त्यापैकी सीआयडीने महेश मोतेवार याच्यासह १७ जणांना अटक केली आहे.
समृद्ध जीवनची काही कागदपत्रे हलविली जात असल्याची माहिती सीआयडीच्या या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांवर पाळत ठेवून ते कोठे जात आहेत, त्यांचा पाठलाग केले. नर्हे आंबेगाव येथील एका इमारतीत ते गेले. या इमारतीतील दोन फ्लॅटमध्ये ही कागदपत्रे ठेवण्यात आली होती. तसेच एका दुकानातही काही कागदपत्रे ठेवली असल्याचे आढळून आले.
मनिषा पाटील, ३ पोलीस निरीक्षकांसह १२ जणांचे पथक आज दिवसभर या कागदपत्रांची पडताळणी करीत होते. या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने समृद्ध जीवन ने देशभरात कोठे कोठे मालमत्ता खरेदी केली. कोठे ज्रमीन आहे याची ही कागदपत्रे आहेत.
महेश मोतेवार यांनी समृद्ध जीवनमार्फत गुंतवणुकदारांची आतापर्यत साडेतीन हजार कोटीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी त्याच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांमधून समृद्ध जीवनची आतापर्यंत ज्ञात नसलेली मालमत्ता समोर आली आहे. ती जप्त करण्यासाठी ही कागदपत्रे सीआयडीला उपयुक्त ठरणार आहे.