पुणे : मोठ्या व्यक्तींवर टीका केल्याशिवाय काही जणांना प्रसिद्धीच मिळत नाही. अशा व्यक्तींना प्रसार माध्यमांनी समजून सांगायला हवे की, टीका केल्याखेरीज देखील आम्ही तुम्हाला कव्हरेज देऊ. मग ते कदाचित टीका करणे बंद करतील अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना नामोल्लेख न करता सणसणीत टोला लगावला.
पुण्यात भाजपच्या एका कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. रोहित पवार हे नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तींवर विविध मुद्दे उपस्थित करून टीका करताना दिसतात. त्याचाच संदर्भ घेत पाटील यांनी रोहित पवारांना लक्ष केले. तसेच यावेळी पाटील यांनी राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर देखील ताशेरे ओढले.
पाटील म्हणाले, राज्य सरकार कोरोनाचे कारण पुढे करून अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकते? मान्य आहे , सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज खूप अस्वस्थ होता. तसेच या समाजातील तरूण-तरूणी यांच्या भवितव्याबद्दल चिंता सुद्धा आहे. पण या समाजाकडून परीक्षेला जो विरोध झाला, हा विरोध जर तुम्हाला स्वीकारार्ह होता तर सरकारने परीक्षा पुढे ढकलायचा निर्णय फार अगोदरच घेणे गरजेचे होते. पण तसे न करता ठाकरे सरकारकडून एमपीएससीसारख्या महत्वाच्या परीक्षेबाबत असा वेळेवर निर्णय घेतला जाणे अतिशय चुकीचे आहे.
पुढे ते म्हणाले, राज्य सरकार दिशाहीन आहे. या सरकारमध्ये निर्णयाची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीतच बसले आहेत. या घडीला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देऊन एक महिना उलटला आहे. आता जर तुम्ही तुमचे वकील सर्वोच्च न्यायालयात पाठवून तुम्ही विनंती करत आहात. मग महिन्याभराच्या कालावधीत राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले गेले नाही का? मराठा समाजातील तरूण-तरूणींना सर्वोच्च न्यायालयात जाऊन व स्थगिती उठून न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित करून पाटील म्हणाले की ,महाविकास आघाडी सरकार असो किंवा मुख्यमंत्री यांनी या परिस्थितीत खरं बोलायला हवे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात महिविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपचे सरकार सत्तेत येईल यावर चंद्रकांत पाटील भाष्य करताना म्हणाले, नड्डा यांचे ते सत्तातंराचे भाकीत आत्ताच्या परिस्थितीला अनुसरून नसून जेव्हा निवडणुका होतील तेंव्हा साठी आहे.