Ajit Pawar: बॉलिवूड बाहेरच्या राज्यात घेऊन जाण्याचा काही लोकांचा प्रयत्न; पण बॉलिवूड कुठेच जाणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 04:41 PM2021-10-22T16:41:00+5:302021-10-22T16:53:42+5:30
राज्यासह पुण्यातील आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरु झाली आहेत. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली
पुणे : राज्यासह पुण्यातील आजपासून नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरु झाली आहेत. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘तिसरी घंटा’ वाजवून नाट्यगृहाची नांदी झाली. यावेळी अजित पवार यांनी भाषणात बॉलिवूड बाहेर घेऊन जाणाऱ्या लोकांवर टीका केली आहे. बॉलिवूड बाहेरच्या राज्यात घेऊन जाण्याचा काही लोकांचा प्रयत्न असेल. तरी बॉलिवूड कुठेच जाणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.
''कोल्हापूरची चित्रपट नगरी आणि मुंबई फिल्म सिटी येथे नवीन चांगल्या सुविधा देऊ. बॉलिवूड बाहेरच्या राज्यात घेऊन जायचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे आहे. तशा पद्धतीने काही राज्यांचे मुख्यमंत्री आले, तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतु इथेच इतक्या चांगल्या सुविधा देऊ की बॉलिवूड कुठेच जाणार नाही....असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले.''
सरकार चालवत असताना हे बंद करा, ते बंद करा हे अजिबात आवडत नाही
''सध्या सगळीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परिस्थिती सुधारत आहे. पण, त्याला कुठे धक्का लागू नये, त्यातून आपल्याकडून काही चुका होऊन तिसरी लाट येऊ नये, ही खबरदारी आम्हाला घ्यावी लागते. सरकार चालवत असताना हे बंद करा, ते बंद करा हे अजिबात आवडत नाही.''
आता ही घंटा कितीदा वाजवायची कुणाला माहिती?
''आम्हाला देवळातली घंटा वाजवायची सवय म्हटल्यावर आता ही घंटा कितीदा वाजवायची हे कोणाला माहिती? अशी मिश्कील टिप्पणी अजित पवार यांनी केली आणि सभागृहात हशा पिकला. नाटक बघता असताना घंटा वाजते तशीच घंटा वाजविण्याचा प्रयत्न मी सर्वांच्या साक्षीने केला...अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.''
कलावंतांना दिलेल्या ५ हजारात काही होणार नाही
''कलाकार कल्याण मंडळ व्हावे, अशी मागणी होते आहे. हे सर्वकाही सुरळीत होऊ देत दिवाळीनंतर एकत्र बसून चर्चा करू. त्यातून सकारात्मक मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. कलावंतांना ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मला हेही माहित आहे की, ५ हजाराने काही होणार नाही. शेवटी सरकार म्हणजे सर्वसामान्य जे कर भरतात त्यातून जो पैसा येतो त्यातून सरकार चालते. त्यात कला पथकांना ५० ते ७० हजार रुपये देण्याचे अधिकार आम्ही जिल्हाधिका-यांना दिले आहेत.''