पुणे : जिल्ह्यात गुरुवारी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर पावसाने मात्र उसंत घेतली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुपारनंतर हलका पाऊस सुरू झाला; पण त्यात बुधवारसारखा जोर नव्हता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता ५० टक्के पाणीसाठा जमा झाला असून, जिल्ह्यातील धरणांतही ४० टक्के पाणीसाठा झाला आहे.
शहरात बुधवारी रात्रीपासून पाऊस थांबला होता. गुरुवारी सकाळी शहराच्या काही भागांत सूर्यदर्शनही झाले. त्यामुळे नागरिकांना संततधारेपासून काहीसा दिलासा मिळाला. दुपारी सुमारे तीननंतर पुन्हा हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यात एक-दोन जोरदार सरीही होत्या. रात्री उशिरापर्यंत हलका पाऊस सुरू होता.
शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या चारही धरणांत मिळून १४.६८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ५० टक्के आहे. खडकवासला धरणातून विसर्गही ४७०८ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणक्षेत्रात झालेला पाऊस (मि.मी.मध्ये) : खडकवासला ५, पानशेत २५, वरसगाव २१ , टेमघर ३०.
जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रांतील पाऊसही कमी झाला आहे. सध्या जिल्ह्यातील धरणे ४० टक्के भरली आहेत; तर कळमोडी व आंद्रा ही धरणे पूर्ण भरली आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये आजवरचा साठा ७८.३१ टीएमसी झाला आहे. पिंपरी शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ५१ टक्के भरले आहे. यात सध्या ४.३४ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांमधील साठा (टक्क्यांत) : कासारसाई ६६.८१, चासकमान ६८.३८, भामा आसखेड ६६.२७, वडिवळे ७९.१७, गुंजवणी ६०.६९, भाटघर ४१.५१, निरा देवघर ३६.२५, वीर ७९.९३, माणिकडोह ३९.२५, डिंभे ३४.३९, पिंपळगाव जोगे २९.६६, येडगाव ८३.८७.
हवामान विभागाने शुक्रवारी शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून, घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर पाऊस कमी होऊन पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही शुक्रवारी घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून त्यानंतर पुढील दोन दिवस घाट परिसरात मुसळधार पाऊस पडेल. तर सोमवारी (दि. १८) पावसात आणखी घट होऊन मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.