पुणे : मराठा आरक्षण संदर्भात सगळं सुरळीत चाललेलं आहे. तुम्ही त्याला काही वेगळं वळण देऊ नका. संभाजीराजे यांनी ६ जूनपर्यंतची मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे. या तारखेला अद्यापही ९ दिवस अवकाश आहे. यादरम्यान नक्कीच चांगला निर्णय घेता येईल. मात्र, मराठा आरक्षणावरून काहींना त्यात राजकारणच करायचे आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना टोला लावला. त्यात छत्रपती संभाजीराजे नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात पालखी सोहळ्याची बैठक संपल्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, माझी आणि संभाजीराजेंची भेट दारातच झाली. आम्ही एकमेकांना फक्त नमस्कार केला; पण राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी पुढाकार घेऊन दिलीप भोसले जे अलाहाबाद हाय कोर्टाचे चीफ जस्टिस आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ते आता यावर काम करत आहेत. राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही भूमिका घेतली नाही, तर रायगडावरून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वैगेरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वांत पुढे मी असेन, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला.
यावर पवार म्हणाले, काही पक्षांनी या मुद्यासाठी रस्त्यावर उतरू अशी भूमिका घेतलीय; पण कशासाठी उतरायचं. चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावर उतरा असं म्हटलंय. त्यांचे ऐकावे लागेल. आता मी, राजेश टोपे देखील मराठा समाजाचे आहोत. आम्हालाही रस्त्यावर उतरावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला.