सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गेल्या हंगामात गळीत झालेल्या ऊस बिलापोटी प्रतिटन तीन हजार रुपये दर जाहीर केला आहे. तीन हजार दर जाहीर करणारा सोमेश्वर जिल्ह्यात पहिला कारखाना ठरला आहे.आज संचालक मंडळाच्या पार पडलेल्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, सोमेश्वर कारखान्याने गेल्या हंगामात पुणे जिल्ह्यात क्रमांक एकने वाटचाल करत ९ लाख ७९ हजार उसाचे गाळप करत क्रमांक एकचा ११.९९ टक्केचा साखर उतारा ठेवत ११ लाख ७४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखाने जिल्ह्यात सर्वांत जास्त २६४२ रुपये एफआरपी एकरकमी अदा केली आहे, संचालक मंडळाच्या सभेत सभासदांच्या उसाला ३०००, तर गेटकेन धारकांना २८०० रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.जगताप पुढे म्हणाले की, आपण बाहेरील कारखान्याची परिस्थिती पाहिल्यास काही कारखान्यानी अद्याप सभासदांना एफआरपी अदा केली नाही. तसेच, त्याची ऊसतोडणी बिलेही देणे बाकी आहेत, परंतु सोमेश्वरने कर्जाची वेळेत परतफेड करत, सभासदांना चांगला दर देण्याचा निर्णय घेतल्याने संचालक मंडळाला समाधान वाटत आहे. तसेच सभासदांच्या ऊस उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषिभूषण संजीव माने यांचे व्याख्यान कार्यक्रम पार पडले होते.कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार (दि. २८) रोजी कारखान्याच्या कार्यस्थळावर दुपारी १ वाजता आयोजित केली असून सभासदानी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे.अॅडव्हान्स अदायेणाऱ्या हंगामासाठी आजपर्यंत २९ हजार ४०० एकरांवर ऊस लागवडची नोंद झाली आहे, या अतिरिक्त ऊस गाळपास कारखान्याने ११०० बैलगाडी, ३५० ट्रक ट्रॅकटर, २०० डम्पिंग आणि ७ हार्वेस्टरशी करार केले असून सर्व ऊसतोडणी यंत्रणेस अॅडव्हान्स अदा केलेला आहे.
‘सोमेश्वर’चा ३ हजार दर जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 2:07 AM