सोमेश्वरनगर: महावितरणच्या सोमेश्वर उपविभागाचे काम आदर्शवत आहे. त्यांनी राबविलेल्या योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. महावितरणमुळे आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला वेळेत पाणी मिळत असल्याने वीजबिल भरून त्यांना सहकार्य करावे असे आवाहन सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले.
सोमेश्वर महावितरणच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पूर्वी सासवड येथील विभागाशी जोडलेले हे कार्यालय गेल्यावर्षी बारामती विभागाला जोडण्यात आले आहे. त्यानिमित्ताने वर्षपूर्तीनिमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचायत समिती सभापती नीता फरांदे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, उपाध्यक्ष शैलेश रासकर, अॅड. रवींद्र माने, उपअभियंता सचिन म्हेत्रे, सरपंच वैभव गायकवाड, तुषार सकुंडे आदी उपस्थित होते.
उपअभियंता सचिन म्हेत्रे यांनी करंजे आणि सुपा येथे नवीन रोहित्र मंजूर करण्यात आले आहे. कोऱ्हाळे आणि होळ येथे नवीन रोहित्र मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी बारामती तालुक्यातील ग्राहकांची सासवड येथील कार्यालयात कोणत्याही कामाची दखल घेतली जात नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यालय बारामतीशी जोडले गेल्याचे होळकर म्हणाले. माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले.
सोमेश्वर येथील महावितरणच्या आढावा बैठकीत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप.
१२०८२०२१ बारामती—०९