पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असण्याचा पोलिसांना संशय आहे. आंदेकर यांच्यावर पाळत ठेवून आराेपींनी खून केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नाना पेठेतील उदयकांत आंदेकर चौकात आंदेकर दररोज सायंकाळी थांबतात, याची माहिती आरोपींना होती. आंदेकरांची बहीण संजीवनीने आरोपींना चिथावणी दिली होती. आरोपींनी पिस्तूल कोठून आणले, तसेच पसार झालेल्या आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने सरकारी वकिलांनी आरोपी बहीण संजीवनी, दीर प्रकाश आणि मुख्य सूत्रधार सोमनाथला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. या तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांनी ९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
वनराज आंदेकर खून प्रकरणात सुरुवातीला संजीवनीचा पती जयंत, दीर गणेश यांना अटक करण्यात आली. त्यानंतर, बहीण संजीवनी (वय ४४), दीर प्रकाश (वय ५१, दोघे रा.नाना पेठ) आणि पसार झालेल्या सोमनाथ (वय ४१, सध्या रा.आंबेगाव पठार, धनकवडी, मूळ रा.अशोक चौक, नाना पेठ) या तिघांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. तिघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. आंदेकर यांचा रविवारी रात्री (दि. १) नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. प्राथमिक तपासात बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी आंदेकर यांचे वाद झाले होते. कौटुंबिक वादातून खून झाल्याची माहिती मिळाली. आंदेकरांच्या सांगण्यावरून दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे, त्याचा मित्र शुभम दहिभाते यांच्यावर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यांत नाना पेठेत हल्ला करण्यात आला होता. कोयता, स्कू-ड्रायव्हरने त्यांच्यावर वार करण्यात आले होते. हल्ल्यात आखाडे याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला होता. आखाडेचा खुनाचा बदला घेण्याचा तयारीत सोमनाथ होता. संजीवनी, प्रकाश, गणेश, जयंत यांच्याशी संगनमत करून सोमनाथने आंदेकरांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या प्रकरणी पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा पोलिस शोध घेत होते.